हजारो नवीन कूपनधारक स्वस्त धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:44+5:302021-09-04T04:25:44+5:30

पाचेगाव : जुलै, २०१९ नंतर शासनाकडून इष्टांक मंजुरी प्रक्रियेचा आदेश नसल्याने नेवासा तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील हजारो ...

Thousands of new coupon holders deprived of cheap grain | हजारो नवीन कूपनधारक स्वस्त धान्यापासून वंचित

हजारो नवीन कूपनधारक स्वस्त धान्यापासून वंचित

पाचेगाव : जुलै, २०१९ नंतर शासनाकडून इष्टांक मंजुरी प्रक्रियेचा आदेश नसल्याने नेवासा तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील हजारो कूपनधारक मोफत आणि स्वस्त धान्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे.

नेवासा तालुक्यात १२९ गावांतील दोन लाखांवर लाभार्थ्यांची संख्या असून, यातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना शासनमान्य स्वस्त धान्य दुकानामार्फत मिळणारे रेशनधान्य नियमाप्रमाणे वितरित होत असले, तरी गेल्या दोन वर्षांपासून नेवासा तालुक्यात नवीन इष्टांक मंजुरी आदेश नाहीत. त्यामुळे हजारो नव्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. या गटातील एकत्रित कुटुंबातून विभक्त झालेल्या आणि नवीन लाभार्थ्यांना नियमित, तसेच मोफत स्वस्त धान्य मिळेनासे झाले आहे. यात अंत्योदय, प्राधान्य गटातील कुटुंबातील लाभार्थ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या प्रकरणी अनेक कुटुंबप्रमुख तालुक्याच्या पुरवठा कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून चकरा मारत आहेत. तालुक्यात १५१ स्वस्त धान्य दुकानदारांची संख्या आहे. मात्र, या स्वस्त धान्य दुकानदारांना जुलै, २०१९ सालापासून शासनाकडून इष्टांक मंजुरीचा आदेश प्राप्त नसल्याने या कुटुंबातील प्रमुखांना तालुका पुरवठा कार्यालयातून हात हलवत माघारी परतावे लागत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे अनेक गावांतील लाभार्थ्यांची हीच परिस्थिती आहे.

...........

गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसभेला स्थगिती असल्याने नवीन रेशन कार्डावरील लाभार्थ्यांना ठराव देण्यास अडचणी येत आहे. जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने ग्रामसभा ठरावाऐवजी ग्रामपंचायत मासिक बैठकीचे ठराव स्वीकारावे.

- श्रीकांत पवार, उपसरपंच, पाचेगाव

...........

तालुक्यातील एकूण लाभार्थ्यांची संख्या दोन लाखांवर आहे. त्यातील अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशनधारकांना नियमित धान्य मिळते. इष्टांक ३० जून, २०१९ पर्यंतचाच मंजूर आहे. त्यामुळे शासनाकडून आदेश आल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.

- सुदर्शन दुर्योधन, तालुका पुरवठा अधिकारी, नेवासा.

..........

दोन महिन्यांपूर्वी पुरवठा कार्यालयाला ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीचा ठराव दिला आहे. आता पुन्हा नव्याने ठराव केला आहे. पुरवठा विभागाने हे ठराव पास करून नवीन अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना धान्य द्यावे.

- भागीरथी पवार, सरपंच, निंभारी ग्रामपंचायत.

Web Title: Thousands of new coupon holders deprived of cheap grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.