भिगवण-अमरापूर मार्गासाठी हजारो वृक्षांची कत्तल; जुनी वृक्षसंपदा नामशेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:50 PM2020-02-16T15:50:30+5:302020-02-16T15:51:21+5:30
भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.
विश्वास रेणुकर ।
राशीन : भिगवण-अमरापूर या २५० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा असलेल्या कित्येक वर्षापूर्वीच्या झाडांची कत्तल सुरू आहे. या कत्तलीने हजारो जुनी झाडे जमीनदोस्त झाली.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून भिगवण (इंदापूर) - अमरापूर (शेवगाव) रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या कर्जत तालुक्यात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या अंतर्गत रस्ता रूंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण होत आहे. रस्ता रूंदीकरण सुरू असल्याने दुतर्फा असलेली नवी, जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाने निविदा काढून एका ठेकेदाराला झाडे तोडण्याचे कामही दिले आहे. सध्या कर्जत ते राशीन मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. राशीन ते खेड या मार्गावर पुलाची कामे सुरू आहेत. दोन्ही मार्गात रूंदीकरणात अडथला ठरणारी झाडे तोडली जात आहेत. त्यामुळे कित्येक वर्षांपासून असलेली जुनी झाडे नामशेष होत आहेत.
मार्किंग केलेल्या झांडाची नेमकी संख्या संबंधित विभागाला विचारण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे ठेकेदार काही मार्किंग नसलेली झाडेही तोडू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.विकासाच्या धमण्या अशी रस्त्यांची ओळख आहे. चांगल्या रस्त्यांमुळे दळण-वळणाचा प्रश्नही सुटणार असला तरी झाडांची कत्तल झाल्याने होणाºया पर्यावरणाच्या नुकसानीचे काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमी उपस्थित करू लागले आहेत.
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षांची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे आहे. त्यामुळे अडथळा ठरणा-या तोडलेल्या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, ठेकादार जास्तीत जास्त झाडे लावणार आहे, असे कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अे.बी. भोसले यांनी सांगितले.
रस्त्याच्या बाजूची काही झाडे साठ वर्षाहून अधिक जुनी आहेत. काही नवी झाडेही आहेत. त्याची कत्तल सुरू आहे. गावांच्या विकासासाठी झाडे तोडणे गैर नसले तरी त्यानंतर मात्र पुन्हा झाडे लावून त्यांचे संवर्धनही त्या संबंधित विभागाने करायला हवे, असे कर्जत भारतीय जनसंसदचे उपाध्यक्ष जावेद काझी यांनी सांगितले.