लोणी : राहाता तालुक्यातील पाथरे बु. येथे बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वन विभागाचे कर्मचारी या बछड्यांच्या आईचा शोध घेत आहेत. संपत नारायण कडू यांच्या शेतातील उसतोच करत असताना मंगळवार (१३ नोव्हेंबर) रोजी ऊसतोड मजुरांना ही तीन पिले आढळून आली.राहाता तालुक्यातील पाथरे बु. येथील संपत नारायण कडू यांच्या गट नं. ३०७ मधील क्षेत्रात ऊस तोड सुरु असताना मंगळवार (दि. १३ नोव्हेंबर) रोजी या उसाच्या क्षेत्रात तीन बिबट्याची पिले ऊसतोड मजुरांना आढळून आली. संपत नारायण कडू यांनी या ठिकाणी असणारी तीन पिले बिबट्याचीच असल्याची खात्री केली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव प्राणी मित्र विकास म्हस्के यांनी याबाबत नगर विभागाचे उप वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांना माहिती दिली. कोपरगांव विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी एस.एन.जाधव, वनपाल बी.एस.गाढे, जी.बी.सुरासे, वन सहाय्यक सी.के.गाढे, यु,बी,खराडे यांना पाथरे घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने बछड्यांचे निरीक्षण केले. हे बछडे दीड ते दोन महिने वयाचे असल्याचे पथकाने सांगितले. या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. परंतु मंगळवारी रात्रभर या बछड्यांची आई या ठिकाणी फिरकली नाही. दुस-या दिवशी बुधवारी सकाळी ही पिले पूर्ववत त्याच जागेवर आढळली. यावेळी हि बछडे भुकेने व्याकुळ झाली असल्याचे वन विभागाच्या कर्मचा-यांच्या लक्षात आले. त्यानंतर लोणी विभागाचे पशुधन अधिकारी डॉ.दशरथ दिघे यांनी या बछड्यांची वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर वन कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या बछड्यांना दूध पाजले. दिवसभर ही बछडे वन कर्मचा-यांच्या निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर रात्री पुन्हा ज्या ठिकाणी आढळली त्याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.