कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली. ही घटना शुक्रवारी (दि.२१ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. मात्र ट्रॉलीचे व शेतक-याच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र साखर कारखान्याचे धुराडे पेटलेले आहेत. यासाठी लागणाºया उसाची शेतातून कारखान्यापर्यंत वाहतूक करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळात बैलांद्वारे वाहतूक करण्यासाठी टायर गाडी वापरात असे. तिलाच डल्लम असे म्हणत. यंदा मात्र ऊस वाहतूक करणा-या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर जोडला आहे. त्यामुळे एकाच खेपेत जास्त ऊस वाहतूक करून जास्त पैसे कमविण्याच्या अभिलाषेपोटी रस्त्याने येणा-या जाणा-या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडत आहे. याकडे मात्र परिवहन खात्याचे दुर्लक्ष होत आहे.
उसाने भरलेला ट्रॅक्टर ट्रेलर गोदावरी नदीत कोसळला; वारी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 5:43 PM