केडगाव : बहीणभावाच्या अतूट नात्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. बहिणीने पाठविलेली राखी भावाच्या हाती वेळेवर पडावी. यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी असतानाही डाक विभागाच्या वतीने राखी वाटपासाठी विशेष मोहीम राबविली आहे. डिजिटल युगातही पोस्टाने राखी पाठवण्याची परंपरा टिकून आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या घरापासून दूर राहावे लागते. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपल्या जिवलगांची प्रत्यक्ष भेट होत नाही. अशावेळी पोस्टाने राखी पाठविण्यास प्राधान्य दिले जाते. कोविड परिस्थितीमुळे पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. या सर्वच राख्या सुरक्षितपणे वेळेत पोहोचविण्यासाठी डाक विभाग नेहमीच प्राधान्य देत असते. रक्षाबंधन हा सण रविवारी आल्याने व रविवारची सुट्टी असतानाही डाक विभागाने राखी वाटप करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेद्वारे नगर विभागातील सर्वच डाकघरांकडून रक्षाबंधनाच्या दिवशी आलेल्या सर्व राख्या भाऊरायांकडे पोहोच केल्या गेल्या.
रक्षाबंधनाच्या दिवशी केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्टर्ड पोस्ट, स्पीड पोस्ट व सध्या पोस्टाने ५५ राख्या वितरणासाठी प्राप्त झाल्या. सर्व राख्या पोस्टमनद्वारे वितरित करण्यात आल्या. ही विशेष मोहीम अहमदनगर विभागात राबविण्यासाठी अधीक्षक एस. रामकृष्ण प्रवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये संतोष यादव उपडाकपाल यांनी सर्वश्री शिवाजी कांबळे, अंबादास सुद्रिक, स्वप्निल पवार, संजीव पवार, अनिल धनावत, सूर्यकांत श्रीमंदिलकर, बाबासाहेब बुट्टे या पोस्टमन बांधवांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे ही विशेष मोहीम यशस्वी झाली.
---
बहीण-भावाच्या अतूट नात्याला अजून घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीने भाऊरायाला पाठवलेली राखी मिळताच भाऊरायाच्या चेहऱ्यावरील समाधान हे निश्चितच आनंद देणारे होते हे माझ्यासाठी परमभाग्यच.
- संतोष यादव,
उपडाकपाल, केडगाव
---
२३ केडगाव राखी
पोस्टमन स्वप्निल पवार हे रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष मोहिमेत राखी वितरित करताना.