पुरामुळे प्रसुतीसाठी खाटेवर प्रवास : बाळाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 04:22 PM2019-08-06T16:22:56+5:302019-08-06T16:24:09+5:30

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सोमवारी रात्री खानापूर येथील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागले.

Traveling on a cot to deliver due to flood: death of a baby | पुरामुळे प्रसुतीसाठी खाटेवर प्रवास : बाळाचा मृत्यू

पुरामुळे प्रसुतीसाठी खाटेवर प्रवास : बाळाचा मृत्यू

श्रीरामपूर : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सोमवारी रात्री खानापूर येथील गरोदर महिलेला प्रसुतीसाठी खाटावर बसून प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यावे लागले. यात नवजात बाळाचा मात्र दुर्दैैवी मृत्यू झाला. मातेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैैद्यकीय अधिकारी सोहेल शेख यांनी दिली.
गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे खानापूर गावाला चांगलाच तडाखा बसला. जुने गावठाण व नव्याने वसलेले गाव असे दोन भाग येथे पुनर्वसनानंतर झाले आहे. जुन्या गावात सुमारे दोनशे कुटुंबे राहतात. येथून जवळच पाच किलोमीटर अंतरावर माळवाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
सोमवारी रात्री गुड्डी बबन बर्डे (वय २२) या महिलेला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. मात्र मध्यरात्री महिलेला माळवाडगाव येथील आरोग्य केंद्रात नेणे शक्य नव्हते. येथील बंधारा पाण्याखाली गेलेला असल्याने कुटुंबीयांचा नाइलाज झाला. त्यांनी महिलेला सकाळपर्यंत वेदनांची कळ काढण्यासाठी समजावले. अखेर मंगळवारी पहाटे पती बबन अंबादास बर्डे, आई विमल मोरे, वडील, दीर, सासरे यांनी खाटावर झोपवून महिलेला छातीएवढ्या पुराच्या पाण्यातून सुरक्षितस्थळी बाहेर आणले. तेथून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसवून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. या दरम्यान पोटातील अर्भकाचा मात्र मृत्यू झाला. महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकारी सोहेल शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
 

Web Title: Traveling on a cot to deliver due to flood: death of a baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.