घारगाव : संगमनेर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे जावून एका कंटेनरवर आदळला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेण्यास अडथळा होत असल्याने सहा तास उलटूनही आंबी खालसा फाटा परिसरात एकेरी वाहतूक सुरू असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.नाशिकहून पुण्याकडे ट्रक (एच. आर. ६९ ए. ८७८७) घेवून निघालेल्या चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रक गतिरोधकावर आदळून दुभाजकाच्या पलीकडे जावून पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या एका कंटेनरवर (एच. आर. ४७ सी. ४७९१) आदळला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस रमेश शिंदे, साईनाथ दिवटे, जानकीराम खेमनर, अरविंद गिरी तात्काळ घटनास्थळी पोहचले. ठप्प झालेली वाहतूक त्यांनी सुरळित केली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सह्याने बाजूला घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याने आंबी खालसा फाटा परिसरात एकेरी वाहतूक सुरू आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर ट्रक कंटेनरवर आदळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 1:13 PM