२४ तासांपासून तुषारचा मृतदेह अद्यापही कुटीर रूग्णालयात,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:30 PM2020-09-15T15:30:17+5:302020-09-15T15:31:25+5:30
संगमनेर/घारगाव : तालुक्यातील टाकेवाडी परिसरातील कुंभारदरा येथील पाझर तलावात (जवळे बाळेश्वर) सोमवारी चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मिर्झापूर येथील २७ वर्षीय युवक तुषार सुभाष दिवटे याचा मृतदेह आढळून आला. तुषारचा मृत्यू हा घातपात असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. आम्हाला संशय असलेल्यांविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेनंतरही तुषारचा कुटीर रूग्णालयात ठेवण्यात आलेला मृतदेह कुटुंबियांनी अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला नव्हता.

संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे तुषार दिवटे हा कुटुंबियांसमवेत राहत होता. शुक्रवारपासून (११ सप्टेंबर) तो बेपत्ता होता. त्याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कुंभारदरा येथील पाझर तलावात तुषारचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तृषारचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढत तो शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात नेण्यात आला. यावेळी तुषारचे कुटुंबिय, नातेवाईक व मित्रांनी तुषारचा मृत्यू हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला.
तुषारची आई अलका सुभाष दिवटे यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना लेखी दिले असून त्यात काही संशयितांची नावे दिली आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी कुटीर रूग्णालयात येवून तुषारच्या कुटुंबियांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधी गुन्हा दाखल करत संशयीत आरोपींना अटक करावी. या मागणीवर तुषारचे कुटुंबीय ठाम आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेनंतरही तुषारचा मृतदेह कुटीर रूग्णालयातच आहे.