पंचवीस एकरांतील ऊस आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:19 AM2020-12-29T04:19:34+5:302020-12-29T04:19:34+5:30
पाथर्डी : तालुक्यातील जांभळी येथील सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पंचवीस एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला. ही घटना रविवारी दुपारी ...
पाथर्डी : तालुक्यातील जांभळी येथील सहा शेतकऱ्यांच्या शेतातील पंचवीस एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. जांभळी गावाच्या शिवारात किसन महादेव आव्हाड, महादेव सुखदेव आव्हाड, नवनाथ नारायण आव्हाड, भगवान निवृत्ती आव्हाड, राधकिसन निवृत्ती आव्हाड, दिलीप आसरुबा आव्हाड यांचे पंचवीस एकर ऊस क्षेत्र आगीत खाक झाले. हा ऊस बारा महिन्यांचा झाला होता. त्याची वाढही चांगली झाली होती. ऊस कारखान्याच्या तोडणीसाठी तयार झालेला होता. काही शेतामध्ये ऊस तोडणी सुरू होती. परंतु, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारा तुटून शॉर्टसर्किट झाले. आगीचे लोळ उसाच्या शेतात पडले. काही क्षणांतच आग सर्वत्र पसरली. आग लागल्याचे समजताच जांभळी गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. परंतु, उसाचे वाळलेले पाचट व जोराचा वारा यामुळे आग मोठ्या प्रमाणावर भडकल्याने पंचवीस एकर क्षेत्रातील उसाला वेढा दिला. त्या परिसरात राहत असलेल्या वस्तीवरील नागरिकांना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. सर्वत्र धुराचे साम्राज्य झाले होते. हाताशी आलेले पीक जळून गेल्याने शेतकरी आणखीनच संकटात सापडले आहेत.
फोटो २७ पाथर्डी आग
जांभळी येथील उसाच्या फडाला लागलेली आग.