भर पावसात लंगर सेवेतून दिले दोन वेळचे जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:19+5:302021-08-23T04:24:19+5:30
अहमदनगर : येथील घर घर लंगर सेवेने सातारामधील पूरग्रस्त भागात जाऊन विविध प्रकारची जीवनावश्यक मदत देऊन पूरग्रस्तांना आधार दिला. ...
अहमदनगर : येथील घर घर लंगर सेवेने सातारामधील पूरग्रस्त भागात जाऊन विविध प्रकारची जीवनावश्यक मदत देऊन पूरग्रस्तांना आधार दिला. लंगर सेवेच्या सेवादारांनी सर्वाधिक फटका बसलेल्या सातारा येथील विविध गावातील वाड्या-वस्तींवर जाऊन गरजूंना मदत दिली. तर काही दिवसांसाठी लंगर सेवा चालवून गरजूंना भर पावसात दोन वेळचे जेवण पुरवले.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लंगर सेवेने विविध जीवनावश्यक वस्तू, किराणा सहित्य, अन्न-धान्य, स्वच्छता साहित्य, कपडे, ब्लँकेट, टॉवेल, कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॅन, कोरोना प्रतिबंधासाठी मास्क, सॅनिटायझर, प्रथमोपचाराची औषधी किटची मदत पाठवली होती. पाटण तालुका (जि. सांगली) येथील किल्ले मोरगिरी, आंबेघर, कोयना नगर, मोर्गणी, झाकदे या गावात गरजूंना महिनाभर पुरेल इतक्या साहित्यांची किराणा किट देण्यात आले. गावात किट वाटप करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे कार्यकर्ते व लायन्सचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित यांचे सहकार्य लाभले. कोयनानगर धरण भागातील शाळेत वास्तव्यास असलेल्या ४५० कुटुंबांसाठी भर पावसात लंगर सेवा देऊन त्यांना जेवण देण्यात आले. सांगली येथे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना मदत पोहोचविण्यात आली. या उपक्रमासाठी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, सुनील छाजेड, प्रशांत मुनोत, राहुल बजाज, मनोज मदान, करण धुप्पड, कैलाश नवलानी, सुनील थोरात, गोविंद खुराणा उपस्थित होते. लंगर सेवेच्या या कार्यासाठी अहमदनगर पोलीस, लायन्स क्लब अहमदनगर, लायन्स क्लब अहमदनगर प्राइड यांचे सहकार्य लाभले आहे.
----------------------
फोटो-२२घर घर लंगर
घर घर लंगर सेवेने सातारा मधील पूरग्रस्त भागात जाऊन विविध प्रकारची जीवनावश्यक मदत देऊन पूरग्रस्तांना आधार दिला. यावेळी हरजितसिंग वधवा व सहकारी.