सदरचे पथक बुधवारपासून शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नळ कनेक्शनची तपासणी करणार आहेत.
तपासणी दरम्यान अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आल्यास त्यास मुदत देऊन ते नळ अधिकृत करण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे. सूचना देऊनही अधिकृत न केल्यास तीन वर्षांची पाणीपट्टी व दंड आकारण्यात येऊन फौजदारी कारवाई करण्याचा इशारा केकाण यांनी दिला आहे. नगरपरिषदेचे कर अधीक्षक डी.सी. साळवे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख लांडे व अन्य पाच कर्मचाऱ्यांची पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे पथक शहरातील प्रत्येक प्रभागातील व्यावसायिक दुकाने, हॉटेल आदी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
दरम्यान नागरिकांच्या पाणीपुरवठा संबंधित समस्या जाणून घेणार आहे. दिवसभरातील अहवाल सायंकाळी सादर करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आली आहे.
कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा योजनेवर मोठ्या प्रमाणात काही नागरिकांनी अनधिकृत नळ कनेक्शन जोडले आहेत, परिणामी या कनेक्शनचा भार, त्यात विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.
.....
दहा, बारा दिवसांनी मिळते पाणी
पाण्यासाठी होणारे हाल, पायपीट यामुळे पाणी प्रश्न नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. दरम्यान ‘लोकमत’ने नागरिकांचे मत जाणून घेत पाणी प्रश्नाला वाचा फोडली. शेवगाव व पाथर्डी शहराला एकाच योजनेतून पाणीपुरवठा होत असताना शेवगावपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाथर्डी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे. मात्र शेवगाव शहरातील नागरिकांना दहा ते बारा दिवसांनी पाणी मिळते, याबाबत ‘लोकमत’ने दोन्ही शहरातील पाणीपुरवठा बाबतची अधिकृत आकडेवारी मिळवत तुलनात्मक आकडेवारी व परिस्थितीची बातमी प्रसिद्ध केली होती.