पोलिसांनी गोदामपालास चौकशी करिता ताब्यात घेतले असून त्यांचा लेखी जबाब घेण्याचे काम सुरू होते. याचप्रकरणी पोलीस दुसऱ्या एकाच्या शोधात असल्याचे समजते.
गुरुवारी रात्री या चारही वाहनचालकांना राजूर पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चौघांनाही १७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. प्रांताधिकारी यांचे आदेशानुसार या चारही ट्रकमधील माल अकोले येथील शासकीय गोदामात पोलिसांसमक्ष उतरविण्यात आला. प्रत्येक वाहनात असणारा धान्यसाठा खाली करत असताना त्यात असणारा माल आणि पावत्यांवर नोंदविण्यात आलेल्या मालात कमी-अधिक असल्याचे पोलिसांना आढळून आले. चारही ट्रक मिळून असलेले एकूण धान्य मात्र यावेळी बरोबर असल्याचे पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी सांगितले. मार्ग ठरवून दिलेल्या वाहनांत कमी अधिक माल कसा निघाला हा प्रश्न निर्माण झाला आहे.
रेशनिंगचा माल पुरविणाऱ्या वाहनांची माहिती, अधिकृत ठेकेदार या व इतर आवश्यक असणाऱ्या माहितीबाबत तहसीलदार यांना पत्र दिले आहे.
रजिस्टरच्या सत्यप्रति तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या चारही ट्रक संदर्भातील माहिती वाहन प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे मागविण्यात आले असल्याचे सपोनि नरेंद्र साबळे व तपास अधिकारी खैरनार यांनी सांगितले.