श्रीगोंदा : जिल्हा बँक निवडणुकीत श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी प्रतिनिधी मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राहुल जगताप, महिला प्रवर्गातून जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांना बिनविरोध संचालक होण्याची लाॅटरी लागली आहे. या निवडीनंतर श्रीगोंद्यात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. मात्र बिगर शेती प्रवर्गातून माजी उपसभापती दत्तात्रय पानसरे हे विखे गटाकडून व थोरात गटाकडून पारनेरचे प्रशांत गायकवाड यांच्यात लढत होणार आहे.
माजी आमदार राहुल जगताप यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा यांनी आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक घेतली. वैभव पाचपुते, प्रवीण कुरुमकर यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी व्यूहरचना आखली. प्रवीण कुरुमकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली, असे जाहीर करायचे. सुरुवातीला वैभव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा. त्यानंतर बाळासाहेब नाहाटा यांना पुढे करून प्रवीण कुरुमकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा अशी रणनीती ठरली. त्यानुसार दाेन्ही अर्ज मागे घेतले गेले. त्यानंतर राहुल जगताप यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.
बिनविरोध जागाबाबत विखे व थोरात गटात समझोता झाला. थोरात गटाकडून अनुराधा नागवडे यांचे नाव पुढे करण्यात आले. त्यानंतर विखे गटाच्या अर्चना पानसरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अनुराधा नागवडे यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.
....
साखर कारखानदारांकडे बँकेच्या चाव्या
राहुल जगताप, अनुराधा नागवडे यांची जिल्हा सहकारी बँकेत एंट्री झाली. त्यामुळे तालुक्यात साखर कारखानदारांकडेच बँकेच्या तिजोरीच्या चाव्या आल्या आहेत. याचे पडसाद २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमटतील हे निश्चित.
पासपोर्ट फोटो
राहुल जगताप, अनुराधा नागवडे, दत्तात्रय पानसरे