पाचेगाव : नेवासा तालुक्यात गावागावांत लसीकरण मोहीम सुरू आहे. निंभारी येथे बुधवारी कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, या टप्प्यात चारशे व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
आतापर्यंत निंभारीत गेल्या तीन टप्प्यात साडेसातशे व्यक्तीचे लसीकरण पूर्ण झाले असून, गावातच लसीकरण होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या निंभारी ग्रामपंचायत प्रशासनाने गावात लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी तालुका आरोग्य यंत्रणेकडे केल्यानंतर गत दोन महिन्यांपासून आरोग्य विभागाकडून गावात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मोठ्या प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध व्हावे, अशी मागणी निंभारीच्या सरपंच भागीरथी पवार, उपसरपंच आशाताई माळी यांनी केली आहे.
लसीकरणासाठी नेवासा खुर्द आरोग्य केंद्राचे डॉ. रवींद्र कानडे, ऋचा आरक, पर्यवेक्षक थोरात, शिवाजी पालवे, पर्यवेक्षिका ज्योती बर्डे, आदींसह आशासेविका यांचे सहकार्य मिळाले.