शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:12 PM2024-11-23T18:12:21+5:302024-11-23T18:13:20+5:30
Assembly Election 2024 Result Live Updates : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.
Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यात २८८ विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीची त्सुनामी पाहायला मिळाली. या त्सुनामीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. आघाडीच्या एकाही पक्षाला किमान विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्याही जागा मिळाल्या नाहीत. यामध्ये अनेक दिग्गज लोकांचा पराभव झाला आहे. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकरे यांच्यासह सलग आठवेळा निवडून येणारे बाळासाहेब थोरात यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे तरुण नेते अमोळ खताळ हे संगमनेरमध्ये जायंट किलर ठरले आहेत.
बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ कोण आहेत?
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. थोरात आणि विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यातील वर्चस्वावरुन कायमच संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच विखेंच्या पराभवानंतर थोरातांना विधानसभेत धक्का देण्याचा चंगच विखे कुटुंबाने बांधला होता. यावेळेस संगमनेर विधानसभा निवडणूक ही विखे पिता पुत्रांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शिंदे गटाने यावेळी तरुण उमेदवार अमोल खताळ यांना तिकीट दिले.
अमोल खताळ यांना विखे पिता पुत्रांचा फक्त पाठिंबाच नव्हता तर संपूर्ण निवडणुकीत रसद पुरवण्याचेही काम त्यांनी केले. या निवडणूक प्रचारादरम्यान अमोल खताळ हेच माझ्यासाठी सुजय विखे आहेत व त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने निवडणुकीमध्ये रंगत आली होती.
अमोल खताळ हे मूळ भाजपचे मतदारसंघ प्रमुख होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात चांगलेच पाय रोवले होते. अमोल खताळ यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यात त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली होती. आजपर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने एकतर्फी विजय मिळत होता. परंतु, अमोल खताळ यांनी या निवडणुकीत थोरात यांना तगडी टक्कर दिली व विजयश्री खेचून आणला.
बाळासाहेब थोरातांविषयी नाराजी?
विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष महसूल मंत्री होते. परंतु, तालुक्यात औद्योगिक वसाहत तयार करण्यात त्यांना अपयश आलं होतं. हाच मुद्दा अमोल खताळ यांनी प्रचारात उचलून धरला. या निवडणुकीत प्रचारादरम्यान संगमनेर मधील युवकांच्या रोजगाराकरिता औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन अमोल खताळ भाषणांमधून देत होते. तसेच बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे आमदार असताना देखील महायुतीने २ वर्षांमध्ये सहाशे कोटींचा निधी या ठिकाणी दिला होता.
लाडकी बहीण योजनेला देखील या तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याने याचा देखील फायदा अमोल खताळ यांना झाला. तसेच थोरात यांनी गौण खनिज माफीया या तालुक्यात तयार केल्याचा आरोप देखील चांगला चर्चेत होता. या प्रकारचे अनेक मुद्दे खताळ यांच्या प्रचारात सकारात्मक वातावरण तयार करत गेले व त्यांना आज विजय मिळाला.