जामखेड : मोहा गावाच्या हद्दीतील कलाकेंद्र गावगुंडाचे अड्डे बनले आहेत. परीसरात अवैध धंदे वाढले असून गुन्हेगारीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येथील कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, या मागणीसाठी मोहा, रेडेवाडी, नानेवाडी, हापटेवाडी येथील ग्रामस्थांनी जामखेड - बीड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी सर्व अहवाल तपासून पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी सरपंच शिवाजीराव डोंगरे म्हणाले, मोहा व रेडेवाडी परीसरातील असलेले कलाकेंद्र बंद करावे म्हणून मोहा गावाने यापूर्वी ग्रामसभेत ठराव केला होता. परंतु त्याची दखल प्रशासन पातळीवर घेतली गेली नाही. आठ दिवसांपूर्वी मोहा ग्रामस्थांनी ६ सप्टेंबरपर्यंत कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मोहा, रेडेवाडी, नाणेवाडी, हापटेवाडी येथील महीला, पुरुष, तरूण, शालेय विद्यार्थी यांनी जामखेड - बीड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. कलाकेंद्रापासून दोनशे मिटर अंतरावर शाळा असल्याने विद्यार्थी व विद्याथीर्नींना त्रास होतो. याबाबत २०१७ च्या ग्रामपंचायतीच्या ठरावामध्ये देखील कलाकेंद्र बंद करण्यासाठी ठराव झाला. मात्र अद्यापही कलाकेंद्रे बंद झाली नाहीत.यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी कलाकेंद्र व कुंटनखाना झाल्यामुळे आमचे गाव बदनाम झाले आहे. मुलांच्या लग्नाला अडचणी येतात,कलाकेंद्राच्या शेजारी राहतात का असा सवाल केला जातो. त्यामुळे सरकारने सर्व कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत अशी मागणी महीलांनी केली.यावेळी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अमोल राळेभात यांनी भाषणे केली. उपसरपंच बाबासाहेब बांगर, ग्रामपंचायत सदस्य अशोक रेडे, भिमराव कापसे, किसन घुमरे, धनंजय घुमरे, संजय डोके, अजित रेडे, मल्हारी रेडे, बाळु रेडे, युवराज घुमरे, सुनिल रेडे यांच्यासह एक ते दिड हजार ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.‘‘मोहा हद्दीतील कलाकेंद्र बंद करण्याबाबत पोलीस निरीक्षकांना याबाबत अहवाल दोनदा मागितला परंतु तो अद्याप मिळाला नाही. पंचायत समितीकडील अहवाल मागितला आहे. तो मिळाल्यावर व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पंधरा दिवसात कायदेशीर कारवाई करण्यात येईल’’, असे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांनी सांगितले.
कलाकेंद्र बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी : जामखेड - बीड मार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:12 PM