पालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या संगमनेर नेवासे या महामार्गाच्या कामाचे एप्रिल-२०२१ मध्ये मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले होते. नगरोत्थान योजना व दलितेतर निधीतून या रस्त्याचे दोन टप्प्यांत काम करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अभियंता राम सरगर यांनी ‘लोकमत’ला दिली.
त्यापूर्वी या मार्गाची अक्षरश: चाळण झालेली होती. जीवमुठीत धरून नागरिक तेथून प्रवास करत होते. एक कोटी ३१ लाख रुपये खर्चाच्या या कामामुळे आता प्रवासाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. अवघ्या चार महिन्यांतच या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. बाजार समिती, आयडीबीआय बँक, बसस्थानक, रेल्वे स्थानक, शहर पोलीस ठाणे, शिवाजी चौक, एचडीएफसी बँक, नॉर्दन ब्रँच या सर्वच परिसरातून जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. पहिल्या काही पावसांतच रस्ता पुन्हा नादुरुस्त होतो. त्यातून एकाच रस्त्यावर अनेकदा खर्च करण्याची वेळ येते.
----------
मर्जीतील काही मंडळी पोसण्याच्या प्रयत्नात कामांची गुणवत्ता ढासळते. नागरिकांच्या पैशांचा मात्र मोठा अपव्यय होतो आहे.
- करण ससाणे, उपनगराध्यक्ष
---------
ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्याकडून दुरुस्तीचे काम करून घेतले जाणार आहे. पाऊस थांबताच त्याला कामाचे आदेश दिले जातील.
-राम सरगर,
अभियंता, पालिका
--------
फोटो ओळी : संगमनेर व नेवासे मार्ग
श्रीरामपूर शहरातून जाणाऱ्या संगमनेर नेवासे रस्त्याच्या नव्याने झालेल्या कामावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.