जिल्ह्यातील माध्यमिकच्या २९ शाळांना अनुदानाची प्रतीक्षा : आदेशाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:40 AM2018-06-07T11:40:18+5:302018-06-07T11:40:38+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खासगी २९ शाळांना शासनाने अनुदान घोषित केले आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदानाचा आदेश राखून ठेवला आहे. अनुदानाचा आदेश कधी निघतो, याकडे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याने जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या खासगी २९ शाळांना शासनाने अनुदान घोषित केले आहे. प्रत्यक्षात मात्र अनुदानाचा आदेश राखून ठेवला आहे. अनुदानाचा आदेश कधी निघतो, याकडे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
शासनाच्या १ व २ जुलै २०१६ च्या निर्णयानुसार जिल्ह्यातील २९ शाळा २० टक्के अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. तसा आदेश नुकताच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. पात्र शाळांना पहिल्या टप्प्यात २० टक्के अनुदान मिळणार आहे. येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होतील.
शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच किमान २० टक्के पगार हातात पडेल, अशी आशा या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना होती. परंतु, शासनाने अनुदानाची घोषणा केली. अनुदानाची घोषणा करतानाच अनुदानाचा स्वतंत्र आदेश काढला जाईल, असे नमूद केले. घोषणा झाल्याने अनुदान मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु, ते कधी मिळणार, याबाबत मात्र संभ्रमाचे वातावरण आहे.
शाळा स्थापनेपासून शिक्षकांनी शाळेसाठी कष्ट उपसले़ कमी पगारात ज्ञानदानाचे काम अविरत सुरू ठेवले. संस्थाचालकांनी पदरमोड करून शाळा उभ्या केल्या. ग्रामीण भागातील मुलांना करावी लागणारी पायपीट थांबली. त्यांची गावातच सोय झाली. गावात माध्यमिक शाळा आली. पण, शिक्षकांना पूर्ण वेतन मिळत नव्हते़ अशा परिस्थितीतही त्यांनी धीर सोडला नाही.
आज ना उधा अनुदान मिळेल, या आशेवर दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांची त्यांची तपश्चर्या फळाला आली. पण, त्यातही शासनाने अनुदानाचा स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अनुदानासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
अनुदानास पात्र घोषित शाळा
कर्जत-२, नेवासा-६, राहुरी-२, राहाता-७, श्रीरामपूर-२, शेवगाव-१, श्रीगोंदा-१, जामखेड-१, नगर-४, पाथर्डी-१
जिल्ह्यातील २९ शाळा २० टक्के अनुदानास पात्र झाल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव शासनाला पाठविला असून, अनुदानासाठीचा स्वतंत्र आदेश निघेल. त्यानंतर शाळांना अनुदान वितरित करण्यात येईल.
-लक्ष्मण पोले, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद