हिवरे बाजारच्या ग्रामसभेत मांडला पाण्याचा ताळेबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 01:12 PM2019-10-09T13:12:36+5:302019-10-09T13:13:58+5:30
नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी हिवरे बाजारमध्ये एकूण ३७० मिलीमिटर पाउस पडला. दरवर्षीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला.
केडगाव : नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. यावर्षी हिवरे बाजारमध्ये एकूण ३७० मिलीमिटर पाउस पडला. दरवर्षीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे पाण्याच्या वापरासाठी पाण्याचा ताळेबंद ग्रामसभेत मांडण्यात आला. ग्रामस्थांशी चर्चा करताना पोपटराव पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे आपल्या सर्वांच्या सहकार्याने पडलेल्या पावसावर आधारित पीक पद्धतीमुळे गेल्या वर्षी कमी पाऊस असूनही गावात पाण्याची टंचाई जाणवली नाही. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत १८३ मि. मि. जास्त पाउस पडलेला आहे. यावर्षीही नेहमीप्रमाणे पडलेल्या पावसाच्या आधारे दरवर्षीप्रमाणे पिकाचे नियोजन केल्यास संभाव्य टंचाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.
याचप्रमाणे प्रत्येक गावाने वास्तव चित्र ध्यानात घेवून आपले पाण्याचे नियोजन केल्यास येणा-या संभाव्य पाणी टंचाईला काही अंशी मार्ग काढता येईल. यावेळी या विशेष ग्रामसभेस दिल्लीवरून कॅग महालेखानियंत्रक हरेंद्रसिंह, सुरेंद्रकुमार, राजेश कुमार आदी उपस्थित होते. ग्रामसभेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.