रेल्वेस्टेशन परिसरात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:15+5:302021-02-24T04:22:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, या भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा. अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिला.
नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी उपायुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. गायकवाड म्हणाले, रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. महापालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वेळोवेळी पाठपुरावा करूनही नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाही. नळाला पाणी आलेच तर अत्यंत कमी असते. रात्री-बेरात्री पाणी सोडले जाते. सुमारे अडीच हजार नागरिक राहतात. पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, महापालिकेने या भागातील पाणीपुरवठा दोन दिवसांत सुरळीत करावा. अन्यथा महापालिकेत हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी निवेदनातून दिला आहे.