जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील तिकोने वस्ती लगतच्या सिद्धेश्वर ओढ्यात शिरूर-निघोज रस्त्यालगतच्या पुलावरून टँकरमधून सोडलेल्या रसायनाने आता रंग बदलला आहे. आता चार दिवसानंतर त्या परिसरातील विहिरींमधील पाणी पिवळसर झाले आहे.
मंगळवारी (दि.२३) रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका टॅँकरमधून सिद्धेश्वर ओढ्यात रसायन सोडले होते. चार दिवस होऊनही तो टँकर चालक, मालक कोण होता? याबाबत प्रशासनाला शोध लागलेला नाही.
याबाबत तिकोने वस्ती परिसरात राहणारे संदीप दत्तात्रेय तिकोने म्हणाले, माझ्या घरासमोरील विहिरीततील पाणी लालसर, पिवळे झाले आहे. काही धोका नको म्हणून शेजा-यांकडून पाणी घेत आहे. सध्या पाऊस असल्याने पाण्याची गरज नाही. मात्र भविष्यात पाणी लागेलच. त्यामुळे प्रशासनाने माझी विहीर स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
याबाबत ग्रामसेवक शशिकांत नरवडे म्हणाले, रसायनाच्या पाण्याचे नमुने पुणे येथील लॅबला तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्याशिवाय शेतक-यांनी पाण्याचा वापर करू नये.