कोपरगाव : वारीसारख्या ग्रामीण भागात गेल्या अनेक वर्षांपासून सोमैया उद्योग समूहाची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचे वेळेावेळी मोठे सहकार्य कारखाना व्यवस्थापनाला लाभले आहे. त्यातूनच येथील प्रकल्प हा दिवसागणिक यशाची शिखरे पार करीत आहेत. त्यामुळे पुढील काळात गावचे तसेच परिसरातील विविध प्रश्न, समस्या हिरीरीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे सोमैया उद्योग समूहाचे नवनिर्वाचित संचालक सुहास गोडगे यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील सोमैया उद्योग समूहाच्या प्रकल्पाच्या संचालकपदी नुकतीच गोडगे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर मंगळवारी ( दि. ६ ) पहिल्यांदाच वारी ग्रामपंचायतीला त्यांनी भेट देऊन ग्रामपंचायत कमिटीसह ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोमैया उद्योग समूहाचे उपमहाव्यवस्थापक बी. एम. पालवे, उपव्यवस्थापक बी. पी. पाटील, वरिष्ठ कामगार अधिकारी संजय कराळॆ उपस्थित होते.
गोडगे म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षात व्यवस्थापन व ग्रामस्थ यांच्यात अनवधानाने काही गैरसमज झाले असतील तर झाले गेले विसरून जात, यापुढे नव्याने सुरुवात करून यापूर्वी कारखाना व्यवस्थापनाच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबविले जात होते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी कटिबद्ध राहू, त्यामुळे ग्रामस्थ व कारखाना व्यवस्थापन यांच्यात समन्वय ठेवूनच काम करायचे आहे.’’ यावेळी बी. एम. पालवे, बी. पी. पाटील, संजय कराळॆ, ‘लोकमत' चे उप-संपादक रोहित टेके, सरपंच सतीश कानडे, सदस्य सुवर्णा गजभिव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, ग्रामपंचायत उपसरपंच मनीषा गोर्डे, सदस्य नंदा निळे, वनिता चव्हाण, रोहिणी निळे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, नवनाथ जाधव, रावसाहेब टेके, प्रकाश गोर्डे, अनिल गोरे, विजय गायकवाड, संजय जाधव, विवेक टेके, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर मोरे, रमाकांत टेके, रावसाहेब वाघ, सतीश गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
.............
फोटो०६- सत्कार वारी, कोपरगाव