चांदीच्या कमळातील साईमूर्तीचे पूजन; तिजोरीतील सोन्याची पूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:41 AM2019-10-28T00:41:43+5:302019-10-28T00:42:11+5:30
मुख्य लक्ष्मीपूजनापूर्वी संस्थानच्या स्ट्राँग रूममधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पूजन करण्यात आले़
शिर्डी : आयुष्यभर फकिराचे आयुष्य जगलेल्या सार्इंच्या संस्थानात भाविकांच्या दानातून आलेल्या सोन्या-चांदीच्या राशी व लाखो रूपयांच्या रूपाने वसणाऱ्या लक्ष्मीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले़ फाटके-तुटके वस्त्र परिधान करणाºया बाबांच्या समाधी व मूर्तीवर लक्ष्मीपूजनानिमित्त कोट्यवधी रूपयांचे सुवर्णालंकार घालण्यात आले होते़ बाबा नेहमी म्हणत, भक्त ठेवतील तसा मी राहील, यानिमित्ताने त्याची प्रचिती आली़
साईसमाधीसमोर सुशोभित केलेल्या चांदीच्या चौरंगावर कमळात असलेल्या लक्ष्मी मूर्तीची व साई मूर्तीची संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व जयश्री मुगळीकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ हजारो भाविकांनी पाकिटात घालून पूजेसाठी दिलेल्या लाखो रूपयांचेही यावेळी पूजन करण्यात आले़
मुख्य लक्ष्मीपूजनापूर्वी संस्थानच्या स्ट्राँग रूममधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पूजन करण्यात आले़ तिजोरीतील साडेचारशे किलो सोने व साडेपाच हजार किलो चांदीसह संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकेत २ हजार २५० कोटींच्या ठेवी आहे़ या निधीचा उपयोग, भाविकांसाठी निवास, प्रसाद भोजन तसेच रूग्णालये, शिक्षण संकुल आदींसाठी संस्थान करत असते़
साईबाबांचे रोजचे दान
भीक्षा मागून खाणारे साईबाबा आपल्या हयातीत रोज ठराविक लोकांना व दीन-दुबळ्यांना किमान दोनशे ते अडीचशे रूपये वाटत. जास्त उत्पन्न मिळते या भावनेतून ब्रिटिश सरकारने बाबांना इन्कमटॅक्स लावण्याचे ठरवले होते. त्यासाठी एक अधिकारी नियुक्त केला़ मात्र बाबांना दानातून मिळणाºया रकमेपेक्षा ते अधिक वाटतात, असे लक्षात आले़ आलेल्या व वाटलेल्या रकमेचा ताळमेळ बसेना. त्यामुळे ब्रिटिश सरकारने अखेर हा नाद सोडून दिला.