अहमदनगर: देशात वाढत चाललेली बेरोजगारी व 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देवून देशातील युवकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आल्याचा आरोप करुन अहमदनगर शहर युवक काँग्रेसच्यावतीने एमआयडीसीच्या स्वागत कमानी समोर रविवारी (दि.17) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेरोजगारीचा केक कापत राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळून भाजप विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अकदस शेख, भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण चव्हाण, मयुर पाटोळे, सागर इरमल, धीरज शिंदे, प्रवीण गीते, तौफिक शेख, अरबाज बेग, तौफिक जहागीरदार, मेहराज शेख, मुन्ना शेख, सुयोग कवडे, नफीस शेख, जितेंद्र यादव, सिकंदर साहनी, धरमेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, शैलेश साहनी, जितेंद्र साहनी, आकाश लोखंडे, अमित लोखंडे, अनिल राव आदींसह युवक कार्यकर्ते व बेरोजगार युवक सहभागी झाले होते.
वर्षाला दोन कोटी रोजगारनिर्मिती करण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले. वर्षाकाठी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, परंतु आजची तरुणांची परिस्थिती बिकट बनली आहे. कोट्यावधी सुशिक्षित युवकांना नोकऱ्या गमावलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातून अनेक उद्योग इतर राज्यात पळविण्यात आले. सरकारी आस्थापनांचे खासगीकरण करून सरकारी नोकऱ्या व आरक्षण संपवण्याचा घाट भाजपने घातला असल्याचा निषेध यावेळी आंदोलकांनी नोंदवला.