लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोनाच्या जीवघेण्या संकटात आजच्या तरुणाईला संसर्ग होऊन मृत्यू होत आहेत तरीही याविषयी तरुणाई अजूनही बेफिकीर असल्याची खंत एका प्रसंगातून कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सूर्यवंशी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रास भेट देण्यासाठी जात होते. वेळापूरनजीक रस्त्याच्या कडेला एका कारसमोर आठ-दहा तरुण गोळा झाल्याचे दिसले. बहुधा अपघात झाला असावा म्हणून मदत करण्याच्या दृष्टीने मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगितले. मात्र, महाराष्ट्र शासनाचे वाहन पाहून कारसमोर जमलेले तरुण अक्षरशः सैराट धावू लागले. मी कारसमोर जाऊन उभा राहिलो. पळ काढलेल्या तरुणांकडे पाहिल्यानंतर त्यापैकी एकाच्या तोंडावर केक फासल्याने सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. कडक लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर भाईचा बर्थडे साजरा करणारे त्याचे समर्थक पाहून खूप संताप आला. मोटारसायकलला किक मारूनही ती सुरू होत नसल्याने भाईचा एक समर्थक आमच्या हाती लागला. त्यावर तुझ्या इतर मित्रांना बोलाव, नाही तर तुम्हा सगळ्यांवर गुन्हा दाखल करीन, असे म्हणताच तो हडबडून गेला. त्याने आपल्या मित्रांना फोन लावायला सुरुवात केली. मात्र, दुरून आपल्या सवंगड्याची ही फजिती पाहणाऱ्या त्याच्या इतर पळपुट्या मित्रांनी क्षणार्धात त्याचा मोबाइल नंबर ब्लॉक केला होता. अडचणीच्या काळात अशी टांग मारणाऱ्या मित्रांमुळे आता तो पुरता रडकुंडीला आला होता. गुन्हा दाखल करणार असं म्हटल्यावर त्याने गावातील इतरांची मदत मागितली. एकाने या सर्व सेलिब्रिटींना शोधून आमच्यासमोर हजर केले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपले पोलीस कर्मचारी व वाहन वेळापूरला पाठविले. पोलिसांना पाहताच आता आपल्यावर गुन्हा दाखल होणार म्हणून ही सर्व बेधुंद मंडळी एका क्षणात जमिनीवर आली. रडवेला चेहरा करून हात जोडू लागली. आमच्या भविष्याचा विचार करा. पुन्हा आयुष्यात अशी चूक करणार नाही, असे म्हणत त्यांनी लोटांगण घातले. पोलिसांसह ग्रामपंचायतीने या तरुणांवर दंडात्मक कारवाई करीत तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या, धडकी भरवणारे मृत्यूचे आकडे, कडक निर्बंध, बेड अन् औषधांची अनुप्लब्धता, लसीकरणाला होणारी गर्दी यामुळे अगदी सगळ्यांचीच अक्षरशः दमछाक होत आहे. बेजबाबदारपणे वागून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालणारी नादान तरुणाई जागोजागी आपल्यातील सार्वजनिक बेशिस्तीचे दर्शन घडवताना दिसत आहे. समाजातील सर्व घटकांच्या शिस्तबद्ध सहभागाशिवाय कोरोनाविरुद्धची ही लढाई आपल्याला जिंकता येणार नाही. त्यासाठी किमान आतातरी आपण जबाबदारीने वागायला हवं. तरुणांनी तर अधिकच.