साहेबराव नरसाळे । अहमदनगर : जिल्हा परिषदेने लाखो रुपये खर्च करुन विकत घेतलेले मौल्यवान साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या सभागृहात अक्षरश: सडत पडले आहे़. मात्र, या साहित्याचा लिलाव करण्याची किंवा कर्मचारी विकत घेण्यास तयार असतानाही ते त्यांना न देता ते सडवण्याची भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याचे दिसत आहे़.जिल्हा परिषदेचा कारभार जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत २००७ साली स्थलांतरित झाला़. त्यावेळी जिल्हा परिषदेने जुन्या इमारतीतील कोणतेही साहित्य नव्या इमारतीत आणले नाही़. जुने सर्व साहित्य जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील अण्णासाहेब शिंदे सभागृहात व बांधकाम विभाग (दक्षिण), आरोग्य व पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले़. या साहित्याचा लिलाव करण्याची मागणी वारंवार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली़. तसेच हे साहित्य बाहेर विकायचे नसल्यास कर्मचा-यांनीही ते विकत घेण्याची तयारी दर्शविली होती़. हे साहित्य सागवानी व दर्जेदार असल्यामुळे ते चांगली किंमत देऊन जिल्हा परिषदेचे कर्मचारीच विकत घेण्यास तयार होते़. याबाबत कर्मचा-यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका-यांना निवेदन दिल्याचेही सांगण्यात येते़. मात्र, जिल्हा परिषदेने याबाबत काहीच निर्णय न घेता गेल्या १२ वर्षांपासून हे साहित्य तेथेच सडत ठेवण्याची भूमिका घेतली़. जुनी इमारत मोडकळीस आली असून, पावसाळ्यात ही इमारत गळत आहे़. त्यामुळे तेथील बरेचसे साहित्य कुजले असल्याचे सांगण्यात येते़. या जुन्या साहित्यामध्ये लोखंडी तिजो-या, लोखंडी कपाटे, सागवानी टेबल, सागवानी खर्च्या, सागवानी कपाटे असे त्यावेळी घेतलेल्या दर्जेदार साहित्याचा समावेश आहे़. या साहित्याचा लिलाव करुन जिल्हा परिषदेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळालेही असते़. परंतु जिल्हा परिषदेने ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी असणा-या जागांच्या हक्काच्या मिळकतीवर पाणी सोडले, त्याचप्रमाणे हे जुने साहित्य विकून अगदी सहज मिळणा-या उत्पन्नावरही पाणी सोडल्याचे दिसत आहे़.उदासीनतेमुळे लाखाचे बारा हजारलोखंडी तिजोºया, लोखंडी कपाटे, सागवानी टेबल, सागवानी खुर्च्या, सागवानी कपाटे असे साहित्य गेल्या १२ वर्षांपासून तसेच पडून आहे़. यातील अनेक साहित्य कुजले आहे़. त्यामुळे आता हे साहित्य टाकूनच द्यावे लागणार आहे़. जे साहित्य विक्रीयोग्य असेल त्यालाही कवडीमोल किमतीत विकावे लागणार आहे़. त्यामुळे जिल्हा परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान अधिका-यांच्या उदासीन वृत्तीमुळे झाले असून, याबाबत कर्मचा-यांमध्येही नाराजी असल्याचे दिसून येत आहे़.
जिल्हा परिषदेत सडतेय लाखो रुपयांचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 2:12 PM