कोपर्डी प्रकरणी जिल्हाभर जनक्षोभ

By admin | Published: July 18, 2016 11:55 PM2016-07-18T23:55:01+5:302016-07-19T00:11:15+5:30

जिल्हाभर ठिकठिकाणी बंद, मोर्चे आणि रस्ता रोको करून नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे़

In the case of Kopardi | कोपर्डी प्रकरणी जिल्हाभर जनक्षोभ

कोपर्डी प्रकरणी जिल्हाभर जनक्षोभ

Next

अहमदनगर : कोपर्डी प्रकरणी सोमवारी जिल्हाभर जनक्षोभ उसळला़ निर्भयापेक्षाही भयानक घटना, असा संताप व्यक्त करत विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आरोपीला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी केली़ दरम्यान जिल्हाभर ठिकठिकाणी बंद, मोर्चे आणि रस्ता रोको करून नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे़
कोपर्डी येथील घटनेचे राज्यभर पडसाद उमटत असतानाच नगर शहरासह जिल्ह्यातील राजकीय पक्ष व संघटनांनीही सोमवारी मोर्चे काढून या घटनेचा तीव्र निषेध केला़ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाची सुरुवातच मोर्चे आणि निषेधाने झाली़ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मोर्चाने आंदोलनाला सुरुवात झाली़ त्यानंतर सेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला़ शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन आरोपीची इनकॅमेरा चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली़ सेनेचे कार्यकर्ते प्रवेशव्दारातून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा प्रवेशव्दारावर धडकला़ पोलिसांनी मोर्चा प्रवेशव्दारावर अडविला़ यावेळी महिला कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ आमदार अरुण जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले़ चर्चेदरम्यान चंद्रशेखर घुले यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली़ निवेदन देऊन आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच राष्ट्रवादीच्या निषेध सभेला सुरुवात झाली़ या सभेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी ही घटना पालकमंत्री राम शिंदे यांचेच पाप असल्याचा आरोप केला़ संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आला़ परकाळे यांनी शांततेचे आवाहन करत श्रध्दांजली सभा घेतली़ सभेत संघटनांच्या प्रतिनिधींनी मंत्र्यांच्या घरात अशी घटना घडली असती तर, ते गप्प बसले असता का? असा सवाल उपस्थित करत पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली़ संघटनांच्या मोर्चात शंभूराजे संस्थेचे सुनील मोरे, संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संतोष गव्हाणे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे कृषीराज टकले, अखिल भारतीय मराठा सेवा छावा युवा संघटनेचे भीम मराठे, जिजाऊ ब्रिगेडच्या छाया महल्ले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते़ हिंदूराष्ट्र सेना, जातीय अत्याचार विरोधी संघर्ष समिती, महिला भारतीय फेडरेशन, कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी, लाल निशान पक्ष आदी संघटनांनी स्वतंत्ररित्या या घटनेचा निषेध केला़
(प्रतिनिधी)
नेत्यांनी व्यक्त केला संताप...
कुटुंबीयांची माफी मागा- सुरेश धस
सहा महिन्यांपूर्वी या घटनेतील मुख्य आरोपीने गावात एकाचा खून केला़ मयताची पत्नी नंदा सुद्रीक यांनी दोन मुलींसह गाव सोडले, ही घटना सहा महिन्यांपूर्वी घडली़ या घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार घेतली नाही़ पोलिसांना तक्रार न घेण्यास फोनवरून सांगण्यात आले़ त्यावेळी जर गुन्हा दाखल झाला असता तर ही घटनाच घडली नसती, असे सांगून हे पाप कुणाचे आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,असा आरोप धस यांनी केला़ सोशल मीडियावरून एकाचा फोटो फिरला़ त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला़ हीच तत्परता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबीयांसाठी दाखविली असती तर बरे झाले असते़ चार दिवस होऊन गेले तरी मुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले नाही़ गावोगावी देशी- विदेशी दारू मिळते़ जिल्ह्यातील महिला सुरक्षित नाहीत़ पोलिसांचा वचक राहिला नाही, सगळेच सैराट झाले असून, हे सैराटचेच लक्षण आहे, असा आरोप माजीमंत्री सुरेश धस यांनी यावेळी केला़
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- अरूण जगताप
मानव जातीला काळीमा फासणारी ही घटना आहे़ घटना घडून गेल्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री अद्याप या गावात फिरकले नाहीत़ प्रशासनाचा वचक राहिला नसून, गाव खेड्यातील महिला असुरक्षित आहेत़ मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा़
पैसे देऊन मुलगी परत येईल का ?- चंद्रशेखर घुले
कोपर्डी गावात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली असता अत्यंत क्रूरपणे या मुलीची हत्या केल्याचे समजले ़ही घटना निर्भयापेक्षा भयानक असून, सरकारला अद्याप जाग आलेली नाही़ सरकारने ४ लाख रुपयांची मदत देऊन कुटुंबीयांची बोळवण केली असून, पैसे देऊन मुलगी परत मिळणार आहे का? असा सवाल उपस्थित करत घुले यांनी सरकारचा निषेध केला़
घटनेमागील खरे सूत्रधार शोधा- अनिल राठोड
या घटनेतील आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे़ अ‍ॅट्रॉसिटीची भीती दाखवून त्याने गावात दहशत निर्माण केली होती़ त्यामुळे हा आरोपी कोण आहे, त्याला कुणाचे अभय होते, याची खोलवर जावून चौकशी करण्याची गरज असून, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी़ जेणेकरून त्याचा गैरवापर होणार नाही़
कडेकोट बंदोबस्त
कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा विविध राजकीय पक्ष व संघटनांनी रविवारी दिला होता़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सकाळीच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता़ दोन्ही ठिकाणी बॅरिकेटस लावून रस्ता अडविण्यात आला़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास छावणीचे स्वरुप आले होते़
अन्यथा रस्त्यावर उतरू,
श्रध्दांजली सभेत इशारा
आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे़ त्याला पोलिसांनी अटक केली़ मात्र, या घटनेत इतरही काही आरोपी असण्याची शक्यता असून, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा़ तसेच सहा महिन्यांत या घटनेचा निवाडा करण्यात यावा, त्यासाठी संघटनांच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल़ दिलेल्या मुदतीत या घटनेचा निवाडा न झाल्यास जिल्हाभर ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा विविध संघटनांनी घेतलेल्या श्रध्दांजली सभेत देण्यात आला़ यावेळी कोपर्डीचे सरपंच सतीष सुद्रीक, संजय सावंत, उबेद शेख, संभाजी दहातोंडे, भीम मराठे, माधुरी भदाने, छाया महाले, डॉ़ अनुराधा ठोंबरे आदींची भाषणे झाली़
गावातील मुलींची शाळा बंद- परकाळे
ही घटना अत्यंत निंदनीय आहे़ सराईत गुन्हेगारांनी हे कृत्य केले असून संपूर्ण कोपर्डी गाव सध्या दहशतीखाली आहे़ गावातील मुलींनी शाळेत जाणे बंद केले आहे़ यावरून गावात या सराईत गुन्हेगारांची किती दहशत होती, ते स्पष्ट होते, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी यावेळी सांगितले़
क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निषेध
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाने निषेध केला.या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश पालवे, शहर जिल्हाध्यक्ष साईनाथ घोरपडे यांनी जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. जिल्ह्यात अवैध दारूविक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांनी तातडीने या दारूअड्ड्यांवर छापे टाकावेत, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे.

Web Title: In the case of Kopardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.