डागवाले यांचा सेनेला जय महाराष्ट्र!

By admin | Published: July 27, 2016 12:10 AM2016-07-27T00:10:36+5:302016-07-27T00:44:08+5:30

अहमदनगर : सात महिन्यांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक किशोर डागवाले यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला आहे.

Dagwale's Senala Jai ​​Maharashtra! | डागवाले यांचा सेनेला जय महाराष्ट्र!

डागवाले यांचा सेनेला जय महाराष्ट्र!

Next


अहमदनगर : सात महिन्यांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक किशोर डागवाले यांनी शिवसेनेलाही जय महाराष्ट्र केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत डागवाले यांना बाजूला टाकून निर्णय घेतले होते. सहा महिन्यांमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख पद देण्याचे वचन सेनेने पाळले नसल्याने नाराज होत शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय डागवाले यांनी घेतला आहे. अडीच वर्षे कुठेही न जाता फक्त काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
शहराच्या मध्यभागातील परिसराचे अनेक वर्षांपासून डागवाले नेतृत्त्व करीत आहेत. शिवसेना-महानगर विकास आघाडी-मनसे-शिवसेना असा त्यांनी प्रवास केला आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला डागवाले यांची नेहमीच मदत झाली असल्याने त्यांचे महापालिकेच्या सत्ताकारणात आतापर्यंत महत्त्व राहिले आहे. मनसेमध्ये फारसे स्वारस्य न राहिल्याने आणि संघटनात्मक पातळीवर त्यांचे सूत न जमल्याने त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड यांना महापालिका निवडणुकीत पराभूत करून डागवाले यांनी शहरात इतिहास घडविला होता. तेव्हापासून राठोड-डागवाले यांचे वितुष्ट जास्तच वाढले होते. अनिल राठोड यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सेना बांधणीसाठी पुढाकार घेतला. शिवसेनेशी दुरावलेल्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून डागवाले यांना सेनेत आणण्यात कोरगावकर यांना यश मिळाले. त्याचवेळी सहा महिन्यांमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख पद देण्याचा त्यांना शब्द देण्यात आला होता.
दरम्यानच्या काळात डागवाले यांनी प्रभागामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्यासाठी त्यांनी माजी आमदार राठोड यांना निमंत्रणे दिली. मात्र, डागवाले यांच्या प्रत्येक कार्यक्रमाकडे पाठ फिरवून डागवाले शिवसेनेत नकोत, असाच राठोड यांनी अप्रत्यक्षपणे संदेश दिला. त्यामुळे डागवाले अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत डागवाले यांना दूर ठेवूनच सर्व रणनिती आखण्यात आली. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी त्यांना शहर विकास आघाडीत नेले.
महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याने तुमची साथ द्या, असे साकडेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी डागवाले यांना घातले होते. त्यामुळे डागवाले शहर विकास आघाडीत गेले आणि त्यांची तिथेच फसगत झाली. सेनेच्या विरुद्ध गेल्याने डागवाले यांना सेनेच्या संघटनात्मक स्तरावर संधी देण्याबाबत राठोड यांच्यासह सर्वच नेत्यांनी नाक मुरडले. त्यामुळे डागवाले यांचे शहरप्रमुख होण्याचे स्वप्न भंगले.
(प्रतिनिधी)

Web Title: Dagwale's Senala Jai ​​Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.