खोट्या सातबारावर शेतीचे खरेदीखत

By admin | Published: August 29, 2014 11:27 PM2014-08-29T23:27:07+5:302014-08-29T23:38:09+5:30

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर शेतकरी नसताना खोट्या सातबारा उताऱ्याच्या आधारे शेतकरी असल्याचे दाखवून शेतजमिनीचे खरेदीखत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Fodder purchase on false seaside | खोट्या सातबारावर शेतीचे खरेदीखत

खोट्या सातबारावर शेतीचे खरेदीखत

Next

मिलिंदकुमार साळवे , श्रीरामपूर
शेतकरी नसताना खोट्या सातबारा उताऱ्याच्या आधारे शेतकरी असल्याचे दाखवून शेतजमिनीचे खरेदीखत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याहून धक्कादायक प्रकार म्हणजे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही नेवासा तहसील कार्यालयाने संबंधितांविरूद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही.
मौजे वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील गट क्रमांक ११३ पैकी क्षेत्र शिवाजी रामदास सूर्यवंशी व बाळू भिवसेन हगवणे यांनी स्वत: शेतकरी नसताना शेतकरी असल्याचे खोटे कागदपत्र दाखल करून खरेदीखत नोंदवून घेतले. हा प्रकार या जमिनीचे मूळ मालक सुधाकर सखाराम आगरकर (रा. मोरगेवस्ती, आगरकरमळा, श्रीरामपूर) यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर तहसील, दुय्यम निबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याविषयी तक्रारी केल्या. सूर्यवंशी व हगवणे यांनी आगरकर यांची शेती खरेदी करण्यासाठी श्रीरामपूरच्या दुय्यम निबंधकांसमोर मौजे बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील गट क्रमांक ३४१ चा शेतकरी असल्याचा सातबारा उतारा जोडला. नेवासा बुद्रूकच्या मंडळाधिकाऱ्यांनी मौजे बेलपिंपळगावमध्ये जाऊन स्थानिक चौकशी केली. तेव्हा गट क्रमांक ३४१/१ हा आकाश बबन आघाडे, अरूण भाऊ आघाडे, बाळासाहेब भाऊ आघाडे, संभाजी भाऊ आघाडे, विठ्ठल भाऊराव आघाडे, रमेश भाऊराव आघाडे, गट क्र. ३४१/२ हा मंगल लक्ष्मण आघाडे, लक्ष्मण विठोबा आघाडे, विजय लक्ष्मण आघाडे, सरस्वती भाऊसाहेब राहिंज, गट क्र. ३४१/३ हा आशाबाई दत्तात्रय बोर्डे, दत्तात्रय गोपीनाथ आघाडे, राजेंद्र गोपीनाथ आघाडे, सोमनाथ दत्तात्रय बोर्डे यांच्या नावाचा असल्याचे निष्पन्न झाले. या क्षेत्राशी, गट क्रमांकाशी सूर्यवंशी व हगवने यांचा संबध, उल्लेख नसल्याचे बेलपिंपळगावच्या तलाठी कार्यालयाचे रेकॉर्ड पाहता त्यांनी खरेदीखतासाठीच्या अर्जासोबत जोडलेला ७/१२ उतारा खोटा असल्याचे निदर्शनास येते, असा स्पष्ट अहवाल नेवाशाच्या तहसीलदारांनी मंडळाधिकाऱ्याच्या १३ फेब्रुवारी २०१४ च्या अहवालावरून १८ फेब्रुवारी २०१४ ला श्रीरामपूर तहसीलदारांना दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुळकायदा शाखेने ६ जून २०१४ ला नेवासा तहसीलदारांना शिवाजी सूर्यवंशी यांनी वळदगाव (ता. श्रीरामपूर) येथील गट क्र. ११३ पैकी २ हेक्टर २० आर शेतजमिनीच्या खरेदी खतासाठी शेतकरी पुरावा म्हणून खोटे ७/१२ उतारे सादर केल्याने त्यांच्याविरूद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करावा. मौजे बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील गट क्र. ३४१ चा खोटा ७/१२ उतारा तयार करण्यात गावच्या तलाठ्याचा सहभाग आहे किंवा कसे याची सविस्तर चौकशी करून सहभाग असल्यास त्यांच्या विरूद्ध कारवाई करावी, असा आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
पण ३ महिन्यात याबाबत नेवासा तहसीलदारांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याने खोट्या कागदपत्रांआधारे फसवणूक करणारे आरोपी मोकाट आहेत.
खरे का खोटे....?
अर्जदाराने दस्तासोबत सादर केलेला उतारा खरा किंवा खोटा आहे, याची शहानिशा करण्याचा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी अधिकाऱ्यांना अधिकार नसतो, असा स्पष्ट अभिप्राय श्रीरामपुरच्या दुय्यम निबंधक श्रेणी-१ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या कार्यालयात होणारे व्यवहार खरे की खोटे देवजाणो, अशीच परिस्थिती आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदीखत केल्याच्या आरोपावरुन यापूर्वीचे दुय्यम निबंधक शिमरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल असून ते जामिनावर आहेत. त्यामुळे पुन्हा या कार्यालयाच्या खरेखोटेपणाचा विषय ऐरणीवर आला आहे.
जूनमध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर ३ महिन्यात नेवासा तहसीलदारांनी याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. या आदेशाप्रमाणे काय कारवाई केली? याची माहिती घेण्यासाठी नेवासा तहसीलमध्ये गेलो असता, तहसीलदारांनी कारवाई करायला, गुन्हा दाखल करायला २/३ वर्षे लागतील, असे सांगितले.
-सुधाकर सखाराम आगरकर, श्रीरामपूर

Web Title: Fodder purchase on false seaside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.