CoronaVirus News : ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:22 AM2021-04-20T04:22:15+5:302021-04-23T14:27:02+5:30
CoronaVirus News : रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ. रजनीकांत आरोळे यांचे चिरंजीव डॉ. रवी आरोळे व कन्या शोभा आरोळे हे जामखेड येथे ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जुलिया हे हॉस्पिटल चालवितात.
जामखेड (जि. अहमदनगर) : देशभरात रेमडेसिविरसाठी रांगा लागत आहेत. एकेका रुग्णाचे बिल लाखो रुपयांपेक्षा अधिक होत आहे. तरीही रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढतच आहे. मात्र, जामखेड येथील आरोळे पॅटर्न जरा वेगळाच आहे. आरोळे यांच्या जुलिया कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी ना रेमडेसिविर इंजेक्शन वापरले जाते, ना महागडी औषधे; तरीही येथील रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. सध्या हॉस्पिटलची पायरी चढायलाच लाख रुपये मोजावे लागतात, अशा वातावरणात जुलिया हॉस्पिटलमध्ये मात्र एक रुपयाही न देता रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत, हे विशेष!
रेमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त दिवंगत डॉ. रजनीकांत आरोळे यांचे चिरंजीव डॉ. रवी आरोळे व कन्या शोभा आरोळे हे जामखेड येथे ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत जुलिया हे हॉस्पिटल चालवितात. कोरोना वाढू लागल्यानंतर त्यांनी जुलिया हॉस्पिटलचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये केले. काेविड रुग्णांवरही डॉ. आरोळे बहीण-भाऊ मोफत उपचार करीत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी ३ हजार ७०० रुग्णांना कोरोनामुक्त केले, तर दुसरी लाट आल्यानंतर १ मार्च ते १८ एप्रिल या काळात १ हजार २५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६५० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनावरील उपचारांसाठी सर्वसामान्यांची खासगी हॉस्पिटलमधून लूट सुरू आहे. ग्रामीण भागात अनेकांवर शेतजमिनी विकण्याची वेळ आली आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता डॉ. आरोळे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मोफत उपचार सुरूच ठेवले आहेत.
डॉ. आरोळे म्हणाले, कोरोनाचा दुसरा स्ट्रेन घातक आहे. यापूर्वी पाचव्या ते नवव्या दिवशी रुग्ण बरा होऊन घरी जात होता. आता क्रिटिकल रुग्ण बरे होण्यासाठी १५ ते २१ दिवसांचा कालावधी लागत आहे. तसेच कोरोनाची लक्षणे बदलली आहेत. कोरोनामुळे फुफ्फुसावर सूज येते. त्यामुळे रक्तातील ऑक्सिजन कमी होतो. रुग्णाची लक्षणे व फुफ्फुसावरील सूज कमी होईल, यानुसार उपचार आवश्यक आहे. १०० रुग्णांत २० रुग्ण गंभीर असतात. त्यातील केवळ ५ टक्के रुग्णांना रेमडेसिविरची गरज असते; पण सध्या डॉक्टर रेमडेसिविरची पाण्यासारखी मागणी करतात. रेमडेसिविर दिले तरच रुग्ण बरा होईल, ही त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्या सूचनेवरून आम्ही औषधांची मात्रा तयार केली आहे व ती परिणामकारक ठरत आहे. विशेष म्हणजे ही औषधे अत्यंत स्वस्त आहेत. ९० टक्के लोक साध्या गोळ्या, औषधाने बरे होतात, असे आरोळे यांनी सांगितले.
मदतीची गरज
डॉ. आरोळे कोविड हॉस्पिटलला आता मदतीची आवश्यकता आहे. दररोज ८० ऑक्सिजन सिलिंडर लागतात. त्यासाठी रोज ५० हजार मोजावे लागत आहेत. रोज ६५० रुग्णांना जेवण, नाष्टा, औषधे दिली जात आहेत. किमान आता ऑक्सिजनची तजवीज गरजेची आहे. आम्ही रुग्णांकडे बिल मागत नाही. परंतु, रुग्णांनी स्वमर्जीने द्यावेत. आम्ही आता आर्थिक संकटात आहोत, असे डॉ. रवी आरोळे व शोभा आरोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.