संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा आज मोर्चा

By admin | Published: July 18, 2016 12:50 AM2016-07-18T00:50:18+5:302016-07-18T00:54:27+5:30

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत़

Today's Front of Various Organizations including Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा आज मोर्चा

संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांचा आज मोर्चा

Next

अहमदनगर: कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत़ या घटनेने जिल्हाभर संतापाची लाट उसळली असून, सोमवारी संभाजी बिग्रेडसह जिल्ह्यातील विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला जाणार आहे़ दरम्यान विधानसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटणार असल्याने जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़
कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली़ अत्यंत क्रूरपणे अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आल्याने या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत़ सुरुवातीला कर्जत व जामखेड येथील जमावाने बंद पाळून संताप व्यक्त केला़ त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिल्हाभर ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला़ रस्ता रोको करून वाहतूक अडविण्यात आली़ प्रशासनाच्या आश्वासनानंतर शिवप्रहार संघटनेसह विविध संघटनांनी कर्जत येथे सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले़ त्याचबरोबर पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्यासह राज्यातील आजी- माजी मंत्र्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन नातेवाईकांना धीर दिला़ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांनी कोपर्डीत येऊन कुटुंबीयांची भेट घेतली़ विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारपासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे जाहीर केले आहे़ भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंतर सेनेच्या मंत्र्यांनीही रविवारी नगर गाठले़ रविवारी सायंकाळी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कुटुंबीयांची भेट घेतली़ राजकीय पक्षांसह जिल्ह्यातील विविध संघटनांनी जिल्हाभर ठिकठिकाणी बंद पाळून या घटनेचा निषेध केला असून, सोमवारी विविध संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत़ जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे़
मोर्चात संभाजी ब्रिग्रेड, शिवसंग्राम, शंभूक्रांती, स्वाभिमानी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा, बुलंद छावा, भूमिपुत्र शेतकरी संघटना, शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत, अशी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे़ जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ मोर्चाने जावून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले़ जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुलेही उपस्थित राहणार असून, तालुक्यात तालुका पदाधिकारी सोमवारी आंदोलन करणार असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)
शिवसेना, राष्ट्रवादीचा मोर्चा
कर्जत तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ मार्केटयार्ड येथून निघून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संदेश कार्ले यांनी दिली़
४घटनेच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथून हा मोर्चा निघणार आहे़ मोर्चाने जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे आ़ जगताप यांनी सांगितले़

Web Title: Today's Front of Various Organizations including Sambhaji Brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.