वृक्ष लागवडीसाठी १० हजार सीड बॉम्ब तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:32 AM2020-06-07T10:32:40+5:302020-06-07T10:32:51+5:30

जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार करण्याला जागतिक पर्यावरणदिनी सुरुवात करण्यात आली.

10,000 seed bombs ready for tree planting | वृक्ष लागवडीसाठी १० हजार सीड बॉम्ब तयार

वृक्ष लागवडीसाठी १० हजार सीड बॉम्ब तयार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात वन जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी डोंगराळ भागात बियाणे फेकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून शहरातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार करण्याला जागतिक पर्यावरणदिनी सुरुवात करण्यात आली. त्यासाठी शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह शहरातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५,६७३ चौ. किमी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. या जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी. क्षेत्रावर जंगल आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८ चौ. किमी तर खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण अत्यल्प आहे.
पर्यावरणातील विविध समस्या जंगलाचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातून फारसे काही हातात पडत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे वृक्षलागवडीऐवजी जंगलातच झाडांचे प्रमाण वाढवून जंगलक्षेत्र व वनाच्छादन वाढवण्याची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅड. आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली.
पावसाळ्यात जंगलात बियाणे फेकण्यासाठी (सीड बॉम्बिंग) नियोजनही झाले. चालू वर्षात नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी उपक्रम राबवण्याची तयारी केली. त्यासाठी शिक्षण विभागानेही पुढाकार घेत विविध साहित्यासाठी जुळवाजुळव केली आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनीही त्यासाठी सहकार्य केले आहे.

शहरातील पर्यावरणप्रेमींसह नाथनचाही सहभाग!
जिल्हा परिषदेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सभापती पांडे गुरुजी यांच्यासोबत शिक्षणाधिकारी मुकुंद, डॉ. ठग, वृक्षप्रेमी नाथन, माजी नगरसेवक अजय गावंडे, नगरसेविका धनश्री देव, नीलेश देव, पूजा काळे, सतीश उंबरकर, शुक्ला, अंकुश ठोकळ, सौरभ बाछुका, नरेंद्र चिमणकर, भास्कर चित्रे यांनी सहभाग घेत जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार केले आहेत.


प्रत्येकाने किमान २२ वृक्ष जगवावे...
माणसाला त्याच्या हयातीत जगण्यासाठी लागणारा आॅक्सिजनचा पुरवठा किमान २२ वृक्षांकडून होतो. त्यामुळे प्रत्येकाने किमान तेवढे वृक्ष लावून जगवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाºयांनी सीड बॉम्ब तयार करण्यात योगदान द्यावे, तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सभापती पांडे गुरुजी यांनी केले.

 

Web Title: 10,000 seed bombs ready for tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.