लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा गुणाबाबतही खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात येत असून, २०२०-२०२१ या वर्षात परीक्षेसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी २१ जूनची मुदत देण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या जिल्हा, विभाग किंवा राज्य स्तरावरील क्रीडा स्तरावरील स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य संपादन केलेल्या किंवा सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येत आहेत. विभागीय शिक्षण मंडळाकडे क्रीडागुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी क्रीडा गुण सवलतीचा अर्ज, शालेय परिशिष्ट ई, परीक्षेचे ओळखपत्र व खेळाचे प्रमाणपत्र त्यावर मुख्याध्यापक व प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सांक्षाकित केलेला प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दि. २१ जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे लागणार आहे.
--------------------
असे आहेत क्रीडा गुणांसाठी पात्र खेळ
आर्चरी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बास्केट बॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलिबॉल, लॉनटेनिस, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वॅश, वुशू, नेहरू हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटिंग/हॉकी, योगासन, किक बॉक्सिंग, सिकई, रोलबॉल, डॉजबॉल, शूटिंगबॉल, टेनिक्वाईट, आट्यापाट्या.
------------------------
२०२०-२०२१ या वर्षात परीक्षेसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करावे. दि. २१ जूनपर्यंत हे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.
- दिनकर उजळे,
जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला.