अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची ११ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, पाच प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या एकूण २१ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी ११ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुक्यातील उगवा येथील दिपक दयाराम कात्रे, प्रल्हाद पांडूरंग सराळे, आगर येथील गजानन परशराम अलोट, मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील सुधाकर विश्वनाथ ढोरे, तेल्हारा तालुक्यातील गोर्धा येथील हिरभाऊ गोविंदराव थोरात , पाथर्डी येथील गणेश श्रीधर अवचार, सिरसोली येथील दशरथ वसंता भारसाकळे, मनात्री बु. येथील दत्ता अण्णा मनतकार, बार्शिटाकळी तालुक्यातील उजळेश्वर येथील तुकाराम रामदास राठोड, पातूर तालुक्यात खानापूर येथील रविंद्र दशरथ धाडसे व अकोट तालुक्यातील पारळा येथील विनायक मधुकर बागलकर इत्यादी शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणांचा समावेश आहे. शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, दोन प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली तर पाच शेतकरी आत्महत्या प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.