११ दिवस, २१ तास, ११ मिनिट बारा राज्यातून खडतर प्रवास - अमित सर्मथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:23 AM2017-12-18T01:23:32+5:302017-12-18T01:24:19+5:30
नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत आणि स्वत:चं आरोग्य सांभाळत अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा ११ दिवस, २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण केली. ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करणारा एकमेव व पहिला भारतीय असल्याचा फार आनंद होतो, असे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित सर्मथ यांनी सांगितले.
नीलिमा शिंगणे - जगड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विश्वातील सर्वात खडतर सायकल स्पर्धा. अमेरिका खंडातील रॅम स्पर्धा. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत तब्बल बारा राज्यांचा प्रवास करताना अक्षरश: कस लागला. कुठे वाळवंटी प्रदेश, तर कुठे कडाक्याची थंडी, कधी जोरदार वार्यासह पावसाचा सामना, तर कधी तब्बल ६0-७0 हजार फुटाची चढाई, कुठे ४५ अंश सेल्सिअसमधूून प्रवास, तर कधी ४.५ अशांपर्यंत घसरलेलं तापमान, अशा नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत आणि स्वत:चं आरोग्य सांभाळत अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा ११ दिवस, २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण केली. ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करणारा एकमेव व पहिला भारतीय असल्याचा फार आनंद होतो, असे आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित सर्मथ यांनी सांगितले.
सायक्लोन आयएमए बधिरीकरणशास्त्रज्ञ परिषदेच्यावतीने रविवार, १७ डिसेंबर रोजी अँटलस सायक्लोन सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेनिमित्त डॉ. अमित सर्मथ अकोल्यात आले आहेत. शनिवारी स्पर्धेच्या पूर्वसंध्येला डॉ. सर्मथ यांनी लोकमतसोबत दिलखुलास संवाद साधून, अमेरिकेतील स्पर्धेतील स्वानुभव सांगितले. तसेच वैद्यकीय क्षेत्रात राहूनही मल्टी टास्किंग हे पॅशन व ट्रायथलॉनचा आयर्न मॅन कसा घडला, हे देखील सांगितले.
शालेय जीवनात प्रत्येकवर्षी गुणवत्ता यादीत येणे हे एकच ध्येय. मात्र, वयाच्या ३२ व्या वर्षी हैदराबाद येथे असताना आयुष्याला वळण मिळाले. मेरिट स्टुडंट ते आर्यन मॅन असा प्रवास या टर्निंग पॉइंटमुळे करता आला. टिपिकल डॉक्टर होण्यापेक्षा काहीतरी वेगळं करू न दाखवायचा हा ध्यासच घेतला होता. पदवीने एमबीबीएस असलो, तरी उत्तम धावपटू, सायकलपटू, पट्टीचा पोहणारा, तायक्वांदोपटू, शरीर सौष्ठवपटू अशी ओळख मिळाली. आता तर आयर्न मॅन म्हणून जागतिक प्रसिद्धी मिळाली, असे डॉ. सर्मथ म्हणाले.
शालेय-महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर नागपुरातच एमबीबीएस करत असताना फिटनेसकरिता जिम ज्वॉइन केला. विदर्भश्री खिताबही पटकाविला. डॉक्टरी पेशात स्थिरावण्यासाठी धडपड सुरू होतीच मात्र, फिटनेस कधीही सोडले नाही. याच काळात धावणे प्रकारात आणि तायक्वांदो खेळात यश मिळत होते. मात्र, करिअर स्थिरावले नव्हते. गुणवत्तेच्या जोरावर अमेरिकेतील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला ‘पब्लिक हेल्थ’ हे स्पेशलायझेशन असल्याचे डॉ. सर्मथ यांनी सांगितले.
भारतात आल्यानंतर सामाजिक जाणीव स्वस्थ बसू देत नव्हती. हैदराबादमधील सामाजिक संस्थेसोबत काम करू लागलो. या दरम्यान ट्रायथलॉन खेळाविषयी माहिती झाली आणि हाच माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. फुकेतमध्ये पहिल्यांदाच ट्रायथलॉनचा अनुभव घेतला. ब्रिटनमध्येही खेळलो. चेन्नई, थुन्नुर, बिंतानमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत शर्यती जिंकल्या, असे डॉ. सर्मथ यांनी सांगितले.
यानंतर २0१६ मध्ये सहा वेळा रॅम विजेता सिना होगन यांनी त्यांच्या क्रु दलामध्ये सामील करू न घेतले. १२ दिवसांच्या स्पर्धेत लागणारा स्टॅमिना आणि स्ट्रेंथची किती गरज लागते, याची कल्पना आली. हाच अनुभव जेव्हा मी स्वत: २0१७ च्या स्पर्धेत सहभागी झालो, तेव्हा कामी आला. माझ्या क्रु मध्ये फक्त एकच सदस्य अनुभवी होता. बाकी सर्व ‘लगान’ सिनेमातील सदस्यांप्रमाणे नवखे, अनुभवशून्य होते. मात्र, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर स्पर्धा जिंकली. १२ दिवसांच्या प्रवासात अनेक मजेशीर किस्से घडले. तेवढेच जिवावर बेतणारे प्रसंगही आले. ते आठवले की, आजही अंगावर काटा उभा राहतो, असे डॉ. सर्मथ म्हणाले. रेस अक्रॉस अमेरिकेच्या धर्तीवर पुणे ते गोवा डेक्कन क्लिफ अँंगर ही शर्यत भारतात आयोजित केली जाते. या मार्गावर २00 किलोमीटर घाट आहेत. अत्यंत खडतर आणि चढ-उतारांनी भरलेला मार्ग. या स्पर्धेत ६४३ किलोमीटर अंतर २९ तासांत पार केल्याने ‘डेक्कन किंग’ अशी नवी ओळख अलीकडेच मिळाली, असल्याचे मिस्कीलपणे डॉ. सर्मथ यांनी सांगितले.