११ सेतू केंद्र संचालकांना ‘शो कॉज’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:03 AM2017-09-07T01:03:10+5:302017-09-07T01:03:15+5:30
अकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात दिरंगाई करणार्या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, ७ सप्टेंबर रोजी खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात दिरंगाई करणार्या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, ७ सप्टेंबर रोजी खुलासा सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) आणि आपले सरकार केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात सेतू केंद्रांना येणार्या अडचणींचे निवारण आणि केंद्रांविरुद्ध तक्रारींची शहानिशा करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या आदेशानुसार ५ सप्टेंबर रोजी तांत्रिक तज्ज्ञांची तपासणी पथके गठित करण्यात आली.
त्यानुषंगाने तपासणी पथकांनी ६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील विविध ठिकाणी सेतू केंद्रांची तपासणी केली असता, कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता जिल्हाधिकार्यांसमक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचा आदेशही सेतू केंद्र संचालकांना नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेले असे आहेत सेतू केंद्र संचालक!
जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये अकोला शहरातील राहुल देशमुख, मंगेश पळसपगार, प्रतिभा काटे, मोहन लुले, चोहोट्टा बाजार येथील येथील रितेश सिरसाट, प्रवीण गव्हाळ, अमोल बोरचाटे, पातूर तालुक्यातील माळराजुरा येथील गोपाल शिंदे, पातूर येथील धनराज शिंदे, नंदा तेलगोटे व मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील रोशन ठोकळ इत्यादी सेतू केंद्र संचालकांचा समावेश आहे.
..तर केंद्र बंद करण्याची कारवाई!
कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या ११ सेतू केंद्र संचालकांनी ७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकार्यांसमक्ष खुलासा सादर न केल्यास संबंधित सेतू केंद्र बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही कारणे दाखवा नोटीसमध्ये देण्यात आला.
तपासणीत आढळली केंद्रांची दिरंगाई!
तपासणीत काही सेतू केंद्र बंद आढळून आले, तर काही केंद्रांनी ५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचा ऑनलाइन एकही अर्ज भरून घेतला नाही, तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याबाबत सूचना फलक लावण्यात आले नाही, दरपत्रक (रेटबोर्ड ) लावण्यात आले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित ११ सेतू केंद्र संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
-