अकोला : कोरोनानंतर राज्यात पहिल्यांदाच ११ ते १५ जानेवारीदरम्यान जिल्हास्तरावर मोतीबिंदू शस्रक्रियेचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गत पाच दिवसांत १,१६५ मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक १३४ शस्रक्रिया सिंधुदुर्गमध्ये तर अकोल्यात ४३ शस्रक्रिया झाल्या आहेत. कोरोनाकाळात जवळपास सर्वच शस्रक्रिया रखडल्याने रुग्णांच्या वैद्यकीय समस्या वाढल्या आहेत. यामध्ये नेत्रविकाराच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून, जवळपास आठ ते नऊ महिन्यांपासून राज्यभरातील नेत्र शस्रक्रिया रखडल्या होत्या. ऑक्टोबर महिन्यात जिल्हास्तरावर काही प्रमाणात नेत्र शस्रक्रियांना सुरुवात करण्यात आली, मात्र अनेक रुग्णांना नेत्र शस्रक्रियेची प्रतीक्षा कायम होती. या रुग्णांसाठी ११ ते १५ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत पाच दिवसांत राज्यात १,१६५ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्या.
अशी आहे विदर्भाची स्थिती
जिल्हा - एकूण शस्रक्रिया
- अकोला - ४३
- वाशिम - ००
- अमरावती - ३०
- यवतमाळ - ९१
- बुलडाणा - ००
- नागपूर - ५२
- वर्धा - १५
- भंडारा - १२
- गोंदिया - ०८
- चंद्रपूर - ५३
- गडचिरोली - ००
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात ११ ते १५ जानेवारीदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत अकाेल्यात ४३ मोतीबिंदूच्या यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या. यासह मागील दोन महिन्यात जिल्ह्यात १२० मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
- डॉ. रमेश पवार, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला