१२ लाख पकडले अन् सोडून दिले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 02:15 AM2016-11-18T02:15:06+5:302016-11-18T02:15:06+5:30
बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी पुरावे केले सादर.
अकोट, दि. १७- १000 व ५00 रुपयांच्या नोटांवर बंदी आल्याने पोलिसांनी शहरातून आवक-जावक होत असलेल्या मोठय़ा रकमेवर लक्ष ठेवले आहे. १७ नोव्हेंबर रोजी गुरुवारी श्रद्धासागरजवळ अकोट शहर पोलिसांनी १२ लाख रुपये पकडले आणि बँकेचे असल्याने चौकशीअंती सोडून दिले.
चलनबंदी झाल्याने पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली आहे. या नाकेबंदीमध्ये वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. श्रद्धासागरसमोर पीएसआय मिश्रा, हे.काँ. सुभाष पवार यांच्या पथकाने १२ लाख रुपये पकडले. १२ लाखांमध्ये २0, ५0, १00 च्या नोटा होत्या. या रकमेविषयी अधिक चौकशी केली असता, सदर रक्कम ही पाथर्डी व मुंडगावच्या सेंट्रल बँकमध्ये जात असल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम अमरावती येथून अकोट मार्गे मुंडगाव-पाथर्डी येथे जात होती.
बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी यासंदर्भात पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांना १२ लाख रुपये परत करावे लागले. दरम्यान, मंगळवारी पकडलेल्या ४ लाख ३0 हजार रुपयांच्या नोटाप्रकरणी आयकर विभागाला कळविण्यात आल्याचे शहर पोलिसांनी सांगितले.