संतोष येलकर अकोला, दि. ३- जिल्हय़ातील प्रमुख जिल्हामार्ग आणि राज्य मार्गावरील अनेक ठिकाणच्या पुलांची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पूल शिकस्त झाले असून, पुलांची रुंदी कमी आहे. बहुतांश पुलांवर कठडे नाहीत. अतवृष्टी आणि नदी-नाल्यांना पूर आल्यास कमी उंची आणि अरुंद असलेल्या पुलांवरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे संबंधित मार्गावरील वाहतूक ठप्प होत असल्याने, नागरिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्हय़ात प्रमुख जिल्हामार्ग आणि राज्य मार्गावरील १२ पुलांची अवस्था धोकादायक आहे. पावसाळ्याच्या दिवसात नदी-नाल्यांना पूर आल्यास या कमकुवत पुलांवरील वाहतूक विस्कळीत होते. तसेच अरुंद पूल आणि कठडे नसल्याने वाहनधारक आणि नागरिकांना जीव मुठीत घेऊनच पूर पार करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हय़ातील धोकायदायक पूल अपघाताच्या प्रसंगांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. नागरिकांसाठी गैरसोयीचे आणि जीवघेण्या ठरणार्या पुलांच्या ठिकाणी नवीन पुलांची कामे मात्र रखडली आहेत.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे माहितीच नाही! जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत जिल्हय़ातील ग्रामीण भागात रस्त्यांवर असलेले काही पूलदेखील शिकस्त झाले आहेत. त्यानुषंगाने धोकादायक असलेल्या पुलांसंबंधी माहितीसाठी बुधवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित कर्मचार्यांशी संपर्क साधला असता, धोकादायक पुलांसंबंधी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यासोबत संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.पाच पुलांच्या कामांची निविदा प्रक्रिया; तीन पुलांच्या कामांना मंजुरी बाकी!जिल्हा मार्ग अंतर्गत उमरी-गुडधी-सांगळूद, वणी-कानशिवणी, म्हसांग-रामगाव-दहिगाव, हिंगणा-गोरेगाव-माझोड व भटोरी-मंगरुळ कांबे या पाच रस्त्यांवर नवीन पाच पुलांची कामे मंजूर असून, या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर राज्य मार्गावरील हातरुण-निमकर्दा, पातुर्डा-उकळी-निंभोरा व आंबेटाकळी -बाश्रीटाकळी या तीन रस्त्यांवरील नवीन तीन पुलांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून, या कामांसाठी शासनामार्फत मंजुरी प्राप्त होणे अद्याप बाकी आहे.असे आहेत मार्गनिहाय रस्त्यांवरील धोकादायक पूल!जिल्हय़ात राज्य मार्गावरील आकोट -अकोला, म्हैसांग-आसरा, आकोट -हिवरखेड, शेगाव-देवरी, हातरुण-निमकर्दा, पातुर्डा-उकळी-निंभोरा, आंबेटाकळी-बाश्रीटाकळी तसेच जिल्हा मार्गावरील उमरी -गुडधी-सांगळूद, वणी-कानशिवणी, म्हैसांग-रामगाव-दहिगाव, हिंगणा-गोरेगाव-माझोड व भटोरी-मंगरुळ कांबे इत्यादी १२ रस्त्यावरील १२ पुलांची अवस्था धोकादायक आहे.
१२ पूल धोकादायक!
By admin | Published: August 04, 2016 1:48 AM