अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत ‘लाॅकडाऊन’ लागू करण्यात आले असून, गरीब कुटुंबांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील १२ लाख ७२ हजार ६१० गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य मिळणार आहे. त्यामुळे ‘लाॅकडाऊन’ कालावधीत गरिबांच्या हाताला रोजगार मिळणार नसला तरी, रोटी मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि मृत्यूची संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने १४ एप्रिल रोजी रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करीत, ‘लाॅकडाऊन’ घोषित केले आहे. ‘लाॅकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत गरीब लोकांच्या हाताला रोजगार मिळणे कठीण होणार असल्याने, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत गरीब लोकांना दरमहा प्रतिव्यक्ती दोन किलो गहू व तीन किलो तांदळाचे मोफत वितरण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंअंतर्गत प्राधान्य गटातील १० लाख ८३ हजार ११८ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत १ लाख ८९ हजार ४९२ शिधापत्रिकाधारक लाभार्थी, अशा एकूण १२ लाख ७२ हजार ६१० गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य मिळणार आहे. त्या अनुषंगाने लाॅकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील गरिबांना रोजगार मिळणार नसला तरी मोफत धान्याच्या माध्यमातून भोजन मिळणार आहे.
जिल्ह्यातील गरीब शिधापत्रिकाधाक लाभार्थींची संख्या!
१२,७२,६१०
तालुकानिहाय लाभार्थींची संख्या
तालुका प्राधान्य गट अंत्योदय
अकोला शहर १,९३,३५६ ५,५७५
अकोला ग्रामीण १,९८,३४८ २६,९०९
बार्शिटाकळी १,०५,४६९ २७,६६८
अकोट १,२६,४६५ ३२,४०८
तेल्हारा १,१०,३९१ २७,२६८
बाळापूर १,३६,६३५ २३,६२८
पातूर ९१,४६८ २०,७८८
मूर्तिजापूर १,२०,९८६ २५,२४८
शासनामार्फत आदेश प्राप्त झाल्यानंतर लाॅकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे.
-बी.यू. काळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी