अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांतर्गत निराधार लाभार्थींना एक महिन्याचा प्रत्येकी एक हजार रुपयांचा ‘ॲडव्हान्स’ देण्याची घोषणा राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७८ निराधारांना एप्रिल महिन्याच्या अनुदानासोबत मे महिन्यातील प्रत्येकी एक हजार रुपयांचा ‘ॲडव्हान्स’ २६ एप्रिल रोजी वितरित करण्यात आला. ‘ॲडव्हान्स’ची रक्कम निराधारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याने, कोरोना संकटाच्या काळात निराधारांना आधार मिळाला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्याअनुषंगाने कडक निर्बंधांच्या कालावधीत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनांतर्गत लाभार्थी निराधारांना सरकारने एक महिन्याचा प्रत्येकी एक हजार रुपये ॲडव्हान्स जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील संबंधित योजनांतर्गत १ लाख ३२ हजार ७८ लाभार्थींना एप्रिल महिन्याच्या अनुदानासोबत मे महिन्यातील प्रत्येकी एक हजार रुपयांच्या ॲडव्हान्सची रक्कम २६ एप्रिल रोजी वितरित करण्यात आली. ॲडव्हान्सची रक्कम निराधार लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, कोरोना संकटाच्या काळात एक महिन्याचा प्रत्येकी एक हजार रुपयांचा ॲडव्हान्स मिळाल्याने निराधार लाभार्थींना दिलासा मिळाला आहे.
योजनानिहाय निराधार लाभार्थींची अशी आहे संख्या
संजय गांधी निराधार योजना
३६९०४
श्रावणबाळ योजना
७२८४३
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
२१५३६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
५०५
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना
२९०
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७८ निराधार लाभार्थींना एप्रिल महिन्याच्या अनुदानासोबत मे महिन्यातील प्रत्येकी एक हजार रुपये ॲडव्हान्सची रक्कम २६ एप्रिल रोजी वितरित करण्यात आली असून, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
राहुल वानखेडे, तहसीलदार (संजय गांधी योजना), जिल्हाधिकारी कार्यालय