अकोल्यात आढळल्या १.३२ लाख कुणबी जातीच्या नोंदी
By संतोष येलकर | Published: November 18, 2023 06:08 PM2023-11-18T18:08:52+5:302023-11-18T18:09:09+5:30
१७ नोव्हेंबरपर्यंत १ लाख ३२ हजार १६६ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.
अकोला : मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने अभिलेखांची तपासणी तसेच नोंदी जिल्हा प्रशासनाकडून तपासण्यात येत आहेत. जिल्ह्यात १७ नोव्हेंबरपर्यंत १ लाख ३२ हजार १६६ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.
मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून, जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये कुणबी जातीसंदर्भातील अभिलेख तपासणीची कार्यवाही सुरू आहे.
९,८२,३५० अभिलेख नोंदी तपासल्या
जिल्ह्यातील तहसील कार्यालये, भूमी अभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कूळ नोंदवही, हक्क नोंदपत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर होत आहे. सातही तालुक्यांमध्ये १९४८ ते १९६७ या कालावधीतील एकूण संख्या ५ लाख ३९ हजार ७०३ अभिलेख नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ७३ हजार ७७९ नोंदी आढळल्या. त्याचप्रमाणे, १९४८ पूर्वीच्या ४ लाख ४२ हजार ६४७ नोंदी तपासण्यात आल्या. त्यात कुणबी जातीच्या ५८ हजार ३८७ नोंदी आढळून आल्या.
तपासणी वेळेत पूर्ण करा - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्ह्यातील शैक्षणिक विभाग, पोलिस विभाग, कारागृह विभाग, जिल्हा उपनिबंधक व इतर सर्व संबंधित यंत्रणांनी अभिलेखांची तपासणी व अभिलेख उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.