पाेलिस उपनिरीक्षकासह अंमलदाराला १४ दिवसांची काेठडी
By आशीष गावंडे | Published: April 25, 2024 10:01 PM2024-04-25T22:01:00+5:302024-04-25T22:01:13+5:30
‘सीआयडी’कडून दाेन फरार आराेपींचा शाेध
अकाेला: अकाेट पाेलिस ठाण्यात पाेलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या गणेश गाेवर्धन हरमकार या युवकाच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या पाेलिस उपनिरीक्षक राजेश जवरे व अंमलदार चंद्रप्रकाश साेळंके या दाेघांची पाेलिस काेठडी संपल्याने त्यांना गुरुवारी राज्य अन्वेषण विभागाने (सीआयडी) न्यायालयात हजर केले असता, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी भानुप्रताप चव्हाण यांनी दाेन्ही आराेपींना १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणी आणखी दाेन फरार आराेपींचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून शाेध घेतल्या जात आहे.
काेणताही गुन्हा दाखल न करता अकाेट पाेलिस स्टेशनमधील पाेलिस उपनिरीक्षक राजेश जवरे, अंमलदार चंद्रप्रकाश साेळंके यांसह आणखी दाेन जणांनी १५ जानेवारी राेजी गाेवर्धन गणेश हरमकार (२७)रा.अकाेट या युवकाला व त्याचे काका सुखदेव हरमकार यांना ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली हाेती. पाेलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच गाेवर्धनचा अकाेल्यातील खासगी रुग्णालयात १७ जानेवारी राेजी मृत्यू झाल्याचा आराेप करीत सुखदेव हरमकार यांनी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गाेऱ्हे यांच्याकडे तसेच अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक रामनाथ पाेकळे यांच्याकडे तक्रार केली हाेती.
या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पाेलिस उपनिरीक्षक राजेश जवरेसह अंमलदार चंद्रप्रकाश साेळंके या दाेघांचे तडकाफडकी निलंबन केले. तसेच १६ एप्रिल राेजी पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात अकोट पोलिस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३०२, ३४ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला हाेता. त्याच दिवशी सदर प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे साेपविण्यात आले.
आराेपींना ८ मे पर्यंत काेठडी
या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’च्या उपअधीक्षक दिप्ती ब्राम्हणे करीत आहेत. गुरुवारी उपराेक्त दाेन्ही आराेपींची पाेलिस काेठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, इतर दाेन फरार आराेपी अद्याप निष्पन्न झाले नसल्याचे ‘सीआयडी’च्यावतीने नमुद करण्यात आले. आरोपी विरुध्द साक्ष पुरावे, तांत्रिक पुरावे गोळा करावयाचे असल्याने आरोपीना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी ‘सीआयडी’ने केली. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी विधीज्ञ जयकृष्ण गावंडे यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने आराेपींना ८ मे पर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली.