लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जुन्या कापड बाजारातील आदिनाथ ट्रेडर्स येथे हिंगोली जिल्ह्यातील एक इसम तब्बल १६ लाख रुपयांची रोकड घेऊन असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून ही रक्कम जप्त केली. सदर रक्कम हवाल्याची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, सदर इसमाने ही रक्कम कोठून आणली, या संदर्भात माहिती न दिल्याने तसेच दस्तावेज सादर न केल्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील रहिवासी संतोष प्रल्हादराव जवादवार (४८) हा १५ ते १६ लाख रुपयांची रोकड घेऊन जुना कापड बाजारातील आदिनाथ ट्रेडर्स येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुना कापड बाजारात सापळा रचून संतोष जवादवार याच्यावर पाळत ठेवली. काही वेळानंतर जवादवार याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल १६ लाख रुपयांची रक्कम पोलिसांना आढळून आली. सदर रक्कम कोठून आणली तसेच या रकमेचे दस्तावेज पोलिसांनी संतोष यास मागितले असता तो दस्तावेज सादर करण्यास असमर्थ ठरला. यावरून पोलिसांनी कलम १०२ अन्वये कारवाई करून १६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. हिंगोली येथील रहिवासी असलेल्या जवादवार याने मात्र ही रक्कम महत्त्वाच्या कामाची असल्याचे सांगत या रकमेचे दस्तावेज लवकरच सादर करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई ही योग्य आहे की अयोग्य, या संदर्भात संशय व्यक्त करण्यात येत आहे.
१६ लाखांची रोकड जप्त
By admin | Published: May 17, 2017 2:15 AM