‘जलयुक्त’च्या कामांवर १९७.७५ कोटी खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:27 PM2020-02-26T12:27:45+5:302020-02-26T12:27:51+5:30
जलयुक्त’च्या या कामांवर १९७ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
- संतोष येलकर
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील ६१३ गावांमध्ये गत डिसेंबर अखेरपर्यंत ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, ‘जलयुक्त’च्या या कामांवर १९७ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
राज्यात वारंवार उद्भणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत २०१४ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये २०१५ पासून जलसंधारणाच्या विविध कामांना सुरुवात करण्यात आली. त्यानुसार २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांच्या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात ६१३ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये गत डिसेंबर २०१९ पर्यंत जलयुक्त शिवारची विविध ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली. गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ‘जलयुक्त शिवार’च्या कामांवर १९७ कोटी ७५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
‘या’ कामांचा आहे समावेश!
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गत चार वर्षात जिल्ह्यात ११ हजार ९९७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, शेततळे, गावतलाव, पाझर तलावांची दुुरुस्ती, डोह खोदकाम इत्यादी जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे.