- सागर कुटे
अकोला : राज्य सरकारने 'ब्रेक द चेन'अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांमध्ये बांधकामे सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे; मात्र ज्या प्रकल्पांमध्ये कामगार तेथेच राहतात, अशा प्रकल्पांना बांधकाम सुरू ठेवता येणार आहे. जिल्ह्यात इनसीटू प्रकल्प नाही व बांधकाम साहित्यही मिळत नसल्याने सर्व इमारतींची बांधकामे बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे जवळपास १६०-२०० कोटींची बांधकाम प्रकल्प अधांतरी आहेत.
कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नव्याने कठोर निर्बंध लागू झालेले आहेत. याअंतर्गत केवळ मेडिकल, दवाखाने सुरू ठेवण्यात आले आहेत. उद्योगांना त्यातून वगळण्यात आले असून, यामध्येही इनसीटू म्हणजेच ज्या उद्योगाच्या आवारातच कामगारांची राहण्याची सोय आहे, अशा उद्योगांना सुरू ठेवण्यास परवानगी आहे. जिल्ह्यात या प्रकारचे केवळ ४ टक्के उद्योग आहेत. त्यामुळे ९६ टक्के उद्योग बंद आहेत. शिवाय सर्व बांधकामेही या काळात सुरळीत राहतील, असे या निर्बंधांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे; परंतु यांनाही इनसीटूची अट ठेवण्यात आली आहे. साहित्य सुद्धा उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यामुळे बांधकामे बंद ठेवावी लागत आहेत. यामुळे १६०-२०० कोटींच्या जवळपास प्रकल्पाचे बांधकाम बंद आहे. साहित्य नसल्याने छोट्या-मोठ्या सर्वच बांधकामांवर परिणाम झाला आहे.
या साहित्याची अडचण
बांधकामासाठी स्टील, सिमेंट, विटा, वाळू या प्रमुख साहित्यासह प्लम्बिंग मटेरिअल, इलेक्ट्रिकल कामासाठी वायरिंग, प्लायवूड, लाकूड, कडी-कोयंडे आदी हार्डवेअरची आवश्यकता असते; परंतु कडक निर्बंधांमुळे या सर्व साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे हे बांधकाम साहित्य मिळणे कठीण झाले आहे.
शहरातील १५-२० मोठ्या प्रकल्पांवर परिणाम
शहरामध्ये कोट्यवधींची बांधकामे सुरू आहेत. यामध्ये जवळपास १५-२० मोठे प्रकल्प आहेत. या निर्बंधांमुळे ही बांधकामेही प्रभावित झाली आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सलग दुसऱ्यावर्षी बांधकाम क्षेत्रावर परिणाम
मागीलवर्षीपासून कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रावर अवकळा आली आहे. काम-धंदे बंद असल्याने नागरिकांनी नवीन घर विकत घेणे बंद केले आहे. अनेक प्रकल्पांच्या इमारती बांधकाम होऊन उभ्या आहेत.
कोरोनाच्या उद्रेकामुळे बांधकाम क्षेत्रावर गंभीर परिणाम जाणवत आहे. बहुतांश प्रकल्प ठप्प पडले आहे. १५०-२०० कोटींच्या जवळपास प्रकल्प निर्माणाधीन आहे. जिल्ह्यातील बांधकामांना मेट्रो शहराचे निकष लावून परवानगी दिली आहे; परंतु अकोला जिल्ह्यात इनसीटू प्रकल्प नाहीत. शहर व परिसरातील बांधकाम कामगार येथील प्रकल्पांवर काम करतात.
- दिनेश ढगे, अध्यक्ष, क्रेडाई