अकोला: गर्भवती आणि बाळांना स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. २०१९-२० चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाकडून ३२ कोटी ७८ लक्ष रुपये अनुदान राज्य शासनाला प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने आर्थिक हिश्शापोटी २१ कोटी ८५ लक्ष ५१ हजार रुपयांच्या अनुदानाला ८ आॅगस्ट रोजी मंजुरी दिली आहे.दुर्गम, अतिदुर्गम भागातील गर्भवती महिलांना वेळेवर आरोग्य उपचार मिळण्यास विलंब होतो. अनेकदा पैशांची चणचण भासत असल्यामुळे गर्भवती महिला आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे नवजात बालकांना वेळोवेळी लसीकरण होत नाही. त्याचा परिणाम बालकाच्या आरोग्यावर होतो. या सर्व बाबी लक्षात घेता ग्रामीण व शहरी भागातील गर्भवती व स्तनपान करणाºया महिलांसाठी केंद्र शासनाने पंतप्रधान मातृ वंदना योजना अमलात आणली. यामध्ये संबंधित महिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र तसेच आशा वर्कर यांच्या माध्यमातून नोंदणी केल्यास त्यांना तीन टप्प्यात ६ हजार रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे. सन २०१९-२० चालू आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाकडून ३२ कोटी ७८ लक्ष २६ हजार रुपये अनुदान राज्य शासनाला प्राप्त झाले आहे. त्यामध्ये ४० टक्के हिस्सा जमा करण्याच्या मोबदल्यात राज्य शासनाने २१ कोटी ८५ लक्ष ५१ हजार रुपये अनुदानाला मंजुरी दिली आहे.रक्कम जमा करण्यास दिरंगाईकें द्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार मातृ वंदना योजनेत पात्र ठरणाºया महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने सहा हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाते. गर्भवती व स्तनपान करणाºया महिलांनी नोंदणी केल्यानंतर तसेच नवजात बाळाला जन्म दिल्यानंतरही अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यास दिरंगाई होत असल्याची माहिती आहे.