मनपाच्या शाळात शिक्षणाची बोंबाबोंब; गुणवत्तेकडे दुर्लक्षअकोला: महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे कायमच दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण विभागासाठी मनपा प्रशासनाच्या अर्थसंकल्पात २३ कोटी आठ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये कार्यरत २८४ शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षकांच्या वेतनासह शालेय पोषण आहार व इतर बाबींचा समावेश आहे. महापालिक ा शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षण विभागासोबतच गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या शिक्षकांचा उदासीनपणादेखील या बाबीला कारणीभूत आहे. त्याचा परिणाम म्हणून की काय, महापालिकेच्या शाळांना उपरती लागल्याचे दिसून येते. २०१४ मध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसमोर झुकत मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मनपा शाळांचे तर्कहिन समायोजन केले. अनेक शाळांमध्ये २० पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांचेसुद्धा समायोजन करण्यात आले. ५७ शाळांपैकी चक्क २३ शाळांचे समायोजन केले. अर्थातच, मनपाच्या ३४ शाळांची स्थिती सुधारण्यासह विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढणार असल्याचा दावा करणारा शिक्षण विभाग आज रोजी तोंडघशी पडल्याचे दिसून येते. शाळांची झालेली दयनीय अवस्था, पडक्या आवारभिंती, गळके छप्पर, खेळण्यासाठी खुल्या मैदानाची कमतरता असे विदारक चित्र पहावयास मिळते. चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सपशेल अपयशी ठरलेल्या शिक्षण विभागासाठी प्रशासनाने अर्थसंकल्पात २३ कोटी ८ लाखांची तरतूद केली आहे. ही प्रशासकीय बाब असली तरी ज्या विभागावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते, त्या विभागाकडून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले जात आहे का, असा सवाल उपस्थित होतो. शिक्षकांनो, आता तरी जागे व्हा!मनपाचे तत्कालीन आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ५७ पैकी २३ शाळांचे समायोजन केल्यानंतर साहजिकच अतिरिक्त शिक्षकांची समस्या निर्माण झाली. शिक्षकांचा सेवा कालावधी लक्षात घेऊन अनेक शिक्षण सेवकांवर नगरपालिकांच्या ठिकाणी जाऊन सेवा बजावण्याची वेळ आली. ३४ शाळांमधील विद्यार्थ्यांची घसरलेली पटसंख्या ध्यानात घेता, सुज्ञ शिक्षकांनो, आता तरी जागे व्हा,असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शिक्षण विभागासाठी २३ कोटींची तरतूद
By admin | Published: April 27, 2017 1:15 AM