अकोला : महावितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर फोडून लाखो रुपयांचे तेल पळविणारी टोळी ‘एमआयडीसी’त सक्रिय असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशीत करताच महावितरणने तत्काळ दखल घेत या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. एमआयडीसीतील १२ ट्रान्सफार्मर फोडून टोळीने आतापर्यंत २३०० लीटर तेल पळविले आहे हे विशेष.अकोला एमआयडीसीच्या फेस तीन आणि दोनमधील ट्रान्सफार्मरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने अनेक उद्योगांचा वीज पुरवठा खंडित होत आहे. एका पाठोपाठ एक अशा घटना सातत्याने एमआयडीसीत घडत आहेत. याचा मागोवा घेतला असता, ट्रान्सफार्मर फोडून त्यातील महागडे तेल चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले. हा बिघाड तांत्रिक नसून, कृत्रिम असल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणल्याने आता महावितरणने ही बाब गंभीरतेने घेतली आहे.एमआयडीसी परिसरातील १२ ट्रान्सफार्मर फोडून त्यातील २,३०० लीटर तेल चोरले आहे. २०० के.व्ही.च्या १२ ट्रान्सफार्मर आतापर्यंत फोडले गेल्याचेही महावितरणने कबूल केले आहे. एमआयडीसीतील तेल तस्करीप्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांना धारेवर धरले आहे. एमआयडीसीत सतर्क राहून तस्करी करणाºयांचा छडा लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्यरात्री आणि पहाटे महावितरणच्या कर्मचाºयांनी एमआयडीसी परिसरात गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेल तस्करी करणाºया टोळीला हुडकून काढण्याची मोहीम महावितरण आणि पोलिसांनी सोबत राबविण्याचे ठरले आहे. त्यामुळे किती आरोपी पकडल्या जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ट्रान्सफार्मर फुटल्याने वीज पुरवठा खंडित राहणार नाही, याची दक्षता महावितरणच्या कर्मचाºयांनी घ्यावी, असे आवाहनही वरिष्ठ अधिकाºयांकडून करण्यात आले आहे.