मूर्तिजापूर : अमरावती येथून दुचाकीवर गांजा घेऊन येणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ अटक केली. त्यांच्याकडून २.३६ लाख रुपयांचा ११ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई ९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
अमरावती येथून दोन युवक मूर्तिजापूर येथे गांजा घेऊन येत असल्याची माहिती अकोला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळताच पथकाने बाजार समितीजवळ सापळा रचून नाकेबंदी केली. दरम्यान, अमरावतीहून दोन युवक विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून येताना दिसले. दुचाकी अडवून चौकशी केली असता ते गांजाची तस्करी करीत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी जावेद खाँ साहेब खाँ (२२, राहणार टेलिफोन कॉलनी मूर्तिजापूर), कपिल रतन शितोळे (२२, रा. पोळा चौक, स्टेशन विभाग, मूर्तिजापूर) यांच्याकडून २ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा, ११ किलो ३१० ग्रॅम गांजा व एक धारदार शस्त्र जप्त करून आरोपींना अटक केली. आरोपीविरुद्ध कलम २० ब, २५ एनडीपीएस ॲक्ट व सहकलम ४, २५, आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजपाल ठाकूर, हेड कॉन्स्टेबल गणेश पांडे, सदाशिव सुडकर, पोलीस शिपाई अब्दुल मजीद, मोहम्मद रफी, गोपाल पाटील, रवी इरचे, वाहन चालक अनिल राठोड, अविनाश मावळे यांनी केली. यातील आरोपी कपिल शितोळे याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. दोन महिन्यांपूर्वी गांजाची विक्री करताना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी त्याला अटक केली होती तर १५ दिवसांपूर्वी तडीपारीचा आदेश काढण्यात आला हाेता.